नवी दिल्ली 31 जानेवारी : तुम्ही एक प्रसिद्ध ओळ अनेकदा ऐकली असेल. ‘पूत कपूत सुने है पर न माता सुनी कुमाता!’ म्हणजेच मुले वाईट स्वभावाची असू शकतात, परंतु आई कधीही मुलांचं वाईट करू शकत नाही. पण सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो असा अपवाद दाखवत आहे, जो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देईल. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक आई तिच्या 3 वर्षाच्या मुलीला अस्वलाच्या आवारात टाकताना दिसत आहे (Mother Drops Daughter in Bear Enclosure).
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) उझबेकिस्तानमधील ताश्कंदमधील प्राणीसंग्रहालयाचा आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, सुमारे 3 वर्षांची एक लहान मुलगी तिच्या आईसोबत प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी येथे आली होती. आई तिला अस्वल दाखवण्यासाठी त्याच्या कुंपणाच्या रेलिंगजवळ उभी राहिली. यानंतर, व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की महिलेनं मुलीला मुद्दामहून स्वतःच्या हातांनी अस्वलाच्या घेरात सोडलं
ती मुलगी खाली पडताच अस्वल तिच्या दिशेनं धावत आलं, पण सुदैवाने त्याने फक्त मुलीचा वास घेतला आणि तिथून निघून गेला. तोपर्यंत प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलाला दुसऱ्या भागात बंद केलं आणि मुलीला वाचवण्यासाठी तिथे पोहोचले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला किरकोळ दुखापत झाली आहे. हे दृश्य पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक भयभीत झाले. ‘काकूबाई’ बनून 28 वर्षाच्या तरुणीने केली बक्कळ कमाई; एका निर्णयाने बदललं आयुष्य वृत्तानुसार, मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आता जर ती न्यायालयात दोषी आढळली तर तिला किमान 15 वर्षे तुरुंगात जावं लागेल. प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, महिलेनं तिच्या बाळाला जाणूनबुजून अस्वलाच्या आवारात फेकून दिलं. तिथे उभ्या असलेल्या लोकांनीही याबाबत साक्ष दिली आणि सीसीटीव्हीतही ते स्पष्टपणे दिसत आहे. लोकांनी तिला खूप थांबवलं पण तोपर्यंत तिनं मुलीला फेकून दिलं होतं. तिच्या या कृत्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.