प्रतीकात्मक फोटो
पाटणा, 28 सप्टेंबर : IAS अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत, भरपूर अभ्यास करावा लागतो. अगदी अडचणींवर मात करून IAS झालेले अधिकारी म्हणजे सर्वांसाठीच प्रेरणा असतात. प्रेरणादायी प्रवास, धडाकेबाज निर्णयासाठी, कामाच्या शैलीसाठी आयएएस अधिकारी चर्चेत असतात. पण सध्या एक महिला आयएएस अधिकारी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एका शालेय विद्यार्थिनीला तिने सर्वांसमोर असा सल्ला दिला की खळबळ उडाली आहे. बिहारच्या पाटणामध्ये मुलींसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आयएएस अधिकारी हरज्योत कौर भामरा प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या. त्या बिहारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रमुख आहेत. सशक्त बेटी, समृद्ध बिहार असं या कार्यक्रमाचं नाव. पण मुलींसाठी असलेल्या या कार्यक्रमातच महिला आयएएस अधिकारी आणि विद्यार्थिनींमध्ये वाद झाल्याचा पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली खळबळजनक वक्तव्य. हे वाचा - IAS Officer च्या दहावीची मार्कशिट का होतेय व्हायरल? ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती. तेव्हा एका विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅडबाबत प्रश्न विचारला. विद्यार्थिनीचा प्रश्न अगदी साधासोपा होता, ‘सरकार सर्वांना काही ना काही देतं. मग 20-30 रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का?’ असं तिने विचारलं. विद्यार्थिनीच्या या प्रश्नावर हरज्योत यांनी उत्तर दिलं. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
आयएएस अधिकारी हरज्योत म्हणाल्या, “अशा मागण्यांना अंत नाही. सरकार आज 20-30 रुपयांचं सॅनिटरी पॅड देऊ शकतं. उद्या जीन्स पँट देऊ शकतं, परवा चपला देऊ शकतं. शेवटी जेव्हा कुटुंब नियोजनाची वेळ येईल तेव्हा कंडोमही मोफत द्यावं लागेल” त्यांचं हे उत्तर ऐकून तिथं उपस्थित सर्वजण हैराण झाले. एका महिलेने हरज्योत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना रोखलं. “ती लहान मुलं आहेत, सरकार जे देऊ शकतं त्यावर विचारत आहेत, तुम्ही असं नाही बोलू शकत”, असं स्टेजवर असलेल्या एका तरुणीने म्हटलं. हे वाचा - धक्कादायक! BHU मधील विद्यार्थिनीचा Yoga करताना अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा त्यावर हरज्योत म्हणाल्या, “सरकारकडून काहीही घेण्याची गरजच काय? हा विचारच चुकीचा आहे. तुम्ही स्वतःच करा ना. तुम्ही स्वतःला भविष्यात कुठे पाहता हे तुम्ही ठरवायचं असतं. तुम्ही आता जिथं बसला आहात तिथं बसायचं की जिथं मी बसेल आहे तिथं? सरकार यासाठी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही”