‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्यापूर्वी विचार कराल, बघा नेमकं काय घडलयं?
नवी दिल्ली, 07 जानेवारी : प्लॅस्टिक पिशव्यांपासून होणारं पर्यावरणाचं नुकसान आता जवळपास सर्वांनाच माहीत आहे. पर्यावरणप्रेमी तर सातत्यानं प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीची मागणी करीत असतात. पण अद्यापही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर म्हणावा तसा कमी झालेला नाही. मात्र, आज तुम्हाला आम्ही समुद्राच्या तळाशी घडलेली अशी एक घटना सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्हीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्यापूर्वी विचार केल्याशिवाय राहणार नाहीत. ‘हिंदुस्थान टाइम्स’ ने याबाबत वृत्त दिलंय.
टाकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या पाण्याखाली गेल्यानं सागरी जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झालाय. समुद्राच्या तळाशी साचणाऱ्या प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्यात विविध सागरी जीव अडकतात, गुदमरतात व यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत अडकलेला मासा दिसतोय. सुदैवाने या माशाची एका पाणबुड्यानं प्लॅस्टिकच्या पिशवीतून सुटका केल्यानं त्याचा जीव वाचला.
हे ही वाचा : भयानक अपघात! आई-वडील खाली पडले, पण चिमुकल्यासह 500 मीटरपर्यंत रस्त्यावर धावत राहिली दुचाकी अन्..VIDEO
माईक हुडेमा या कॅनेडियन व्यक्तीनं ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. या पूर्वी हा व्हिडिओ ‘द पर्ल प्रोटेक्टर्स’ नावाच्या हँडलवर शेअर केला गेला होता. ‘द पर्ल प्रोटेक्टर्स’ ही एक संस्था असून ती समुद्री परिसंस्थेच्या सौंदर्याबद्दल जागरूकता वाढवून आणि भावनिक असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन श्रीलंकेच्या सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या ट्विटर हँडलवरच याबाबत माहिती देण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हिडिओमध्ये दिसतंय की, समुद्राच्या तळाशी एक मासा प्लॅस्टिकच्या पिशवीत अडकल्यानं तडफडत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर एका पाणबुड्यानं हा मासा ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत अडकलाय, ती पिशवी उचलून त्यामधून माशाची सुखरूप सुटका केली. हा व्हिडिओ 26 डिसेंबर 2022 रोजी शेअर करण्यात आला होता. व्हिडिओला 48,000 हून अधिक व्ह्यूज तर जवळपास 1,700 लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी विविध कमेंट्स पोस्ट केल्यात. एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘ही व्यक्ती खूप दयाळू आहे. किती चांगला माणूस आहे.’ तर आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘पाण्याचं रक्षण करा. खाली जिवंत प्राणी आहेत!’
हुडेमा लिहितात…
दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या माईक हुडेमा यांनी व्हिडिओ सोबत एक कॅप्शन लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘या पाणबुड्यानं प्लॅस्टिकमध्ये अडकलेल्या माशाला वाचवले. आपण टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यात असंख्य सागरी प्राणी अडकतात. अगदी लहान प्लॅस्टिक पॅकेजिंगदेखील पाण्याखाली प्राणघातक आहे.’
हे ही वाचा : धावत्या ट्रेनमध्ये चढताना खाली पडला अन् तसाच फरफटत गेला वृद्ध, मग..; धक्कादायक घटनेचा Video Viral
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केल्यानंतर त्या पिशव्यांची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. तसेच शक्यतो अशा पिशव्यांचा वापरच टाळणं महत्त्वाचं आहे. अन्यथा या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळता येणार नाही, व त्यामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.