नेपाळ अपघात
नवी दिल्ली, 16 जानेवारी : नेपाळ मधील पोखरा येथे रविवारी सकाळी यती एअरलाइन्सचे ATR-72 विमान कोसळले. या विमानात एकूण 72 लोक होते. विमानाच्या या भीषण अपघातात 68 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या धक्कादायक अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. अजूनही या अपघातासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच या विमान अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या या अपघातापूर्वी विमानातील एका एअर होस्टेसने टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. या एअर होस्टेसचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस खूप आनंदी दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ प्लेनमधील असून सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडीओच्या बॅग्राउंडला पहला नशा गाण्याचे म्युझिक एकू येत आहे.
या एअर होस्टेसच्या व्हिडीओवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ @DeepAhlawt या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी सॅड कमेंट केल्या आहेत. नेपाळ विमान अपघाताचं सध्या सर्वत्र दुःख व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, नेपाळ अपघातातील विमानात 72 लोकांपैकी 68 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी 4 मृतदेहांचा अद्याप शोध सुरु आहे. या विमानात पाच भारतीय नागरिकही होते. यातील चौघे उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे रहिवासी होते. आज सकाळी 9 वाजता मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू करण्यात आले. ज्यांची ओळख पटली ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे कामही सुरू आहे. यासोबतच भारतीयांसह परदेशी नागरिकांचे मृतदेह काठमांडूत आणले जात असल्याने ज्यांची ओळख पटली नाही ते मृतदेहही डीएनए चाचणीसाठी काठमांडूत आणले जाणार आहेत. भारतीय दूतावास या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे.