घोड्याचं खतरनाक रूप.
पीयुष शर्मा/लखनऊ**, 01 जानेवारी :** आतापर्यंत बैल, श्वान, माकड अशा प्राण्यां च्या हल्ल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशा भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यात काही लोकांचा जीवही गेला आहे. पण सध्या बैल, श्वानांप्रमाणे एका घोड्याची दहशत आहे. उत्तर प्रदेशमध्ये घोडा चक्क भटक्या श्वानासारखा झाला आहे. रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर हल्ला करत त्यांना चावतो आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. घोड्याच्या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ ही समोर आला आहे. यूपीच्या मुरादाबादच्या उच्चभ्रू परिसरातील ही घटना आहे. बुद्धिविहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका भटक्या घोड्याने थैमान घातलं त्यामुळे कुणीही रस्त्यावर येत नाही आहे. या घोड्याच्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक घोडा रस्त्याने शांत चालताना दिसतो आहे. इतक्यात एक व्यक्ती हातात काठी घेऊन येत आणि त्या घोड्याला मारायला जाते. तसा घोडा उधळतो आणि त्या व्यक्तीवर हल्ला करतो. घोड्याने हल्ला करताच ती व्यक्ती जमिनीवर पडते. तसा घोडा त्याच्याजवळ जातो आणि पुन्हा हल्ला करतो. त्या व्यक्तीला चावतो आणि नंतर पायाखाली तुडवतोही. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हे वाचा - चालता चालता अचानक चवताळला शांत बैल…; त्यानंतर पुण्याच्या रस्त्यावर जे घडलं ते धडकी भरवणारं; पाहा VIDEO बुद्धिविहार सेक्टर-1 चं हे दृश्य आहे. ज्या व्यक्तीवर घोड्याने हल्ला केला आहे, त्या व्यक्तीचं नाव कैलाश तोमर आहे. ते घोड्याला आपल्या घराजवळून बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच घोड्याने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. आराडाओरडा झाल्यानंतर घोड्याने तिथून पळ काढला. एका रिक्षावाल्यावरही या घोड्याने हल्ला केला आहे. त्याच्या हाताची दोन्ही बोटं त्याने चावली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसांत या घोड्याने 12 पेक्षा अधिक लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. कैलाश तोमर यांनी सांगितलं की त्यांनी याबाबत मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दिली आहे. या भटक्या घोड्याला पकडण्याची मागणी केली आहे. तसंच स्थानिकांनी मुरादाबाद नगरपालिकेकडे या घोड्याला लवकरात लवकर पकडून दूर सोडून येण्याची मागणी केली आहे. हे वाचा - इवलासा उंदीर कुटुंबासाठी बनला देवदूत; एकाच वेळी 5 माणसांचा वाचवला जीव मुख्य पशु चिकित्सा अधिकारी डॉ. अनिल कंसल म्हणाले, हे नगरपालिका स्तरावरील प्रकरण आहे. नगरपालिकाच या घोड्याला पकडेल. या घोड्यांना कुठूनतरी आणून सोडलं आहे. आता नगरपालिकाच यावर कार्यवाही करेल. दरम्यान याबाबत नगर आयुक्त अनिल कुमार सिंह यांना फोन करण्यात आला तेव्हा त्यांनी बिझी असल्याचं सांगून फोन कट केला. नगर आयुक्त संजय चौहान यांच्याशी काही संपर्क झालेला नाही.
पशू तज्ज्ञांच्या मते, या घोड्याला रेबीज असू शकतो. त्याचा आहार आणि त्याच्या क्रियांवर लक्ष ठेवायला हवं. जर 15 दिवसांत घोड्याचा मृत्यू झाला तर लोकांना अँटी सीरम लावावा लागेल. लोकांवर वेळीच उपचार झाले नाही तर त्यांचा जीव जाऊ शकतो.