वाघाची समोरासमोर शिकार; पर्यटकांना घाम फुटला! व्हिडिओ व्हायरल
सृजित अवस्थी, प्रतिनिधी पिलिभीत 1 जून : उत्तर प्रदेशातील पिलिभीत व्याघ्र प्रकल्पातील व्हायरल होणारे सर्वच व्हिडीओ अंगावर काटे आणणारे असतात. परंतु आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात तर वाघाने थेट पर्यटकांसमोरच शिकार केल्याचं पाहायला मिळतंय. हे भयानक दृश्य प्रत्यक्षात पाहून तेथील पर्यटकांना चांगलाच घाम फुटला असणार. खरंतर या व्याघ्र प्रकल्पाचा पर्यटन हंगाम आता शेवटच्या दिवसांत आहे. त्यामुळे पर्यटक इथे मोठ्या संख्येने भेट देत असतात. बुधवारी या प्रकल्पात पर्यटकांचा एक गट टायगर सफारीचा आनंद घेत होता. त्याचदरम्यान अचानक जंगलातून आलेल्या चवताळलेल्या वाघाने भटक्या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. कळपात सहा प्राणी होते. त्यापैकी एक त्याच्या तावडीत सापडला, तर पाचजण जीव मुठीत धरून पळून गेले. ही जिवंत शिकार डोळ्यांसमोर पाहून पर्यटकही रोमांचित झाले. एका पर्यटकाने या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर अपलोड केला, जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. दरम्यान, पिलिभीत व्याघ्र प्रकल्पाचा पर्यटन हंगाम पावसाळ्यापूर्वी 15 जूनला संपतो. त्यामुळे आता आजपासून या प्रकल्पाचे दरवाजे पर्यटकांसाठी केवळ 15 दिवस खुले राहतील. तुम्हाला याठिकाणी जायचे असेल तर त्वरित बुकिंग करा.
बुकिंगसाठी तुम्ही http://pilibhittigerreserve.in/ या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकता.