नवी दिल्ली 07 एप्रिल : तुम्ही अनेकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की देव सगळं बघत असतो. देव माणसाला त्याच्या कर्माचं फळ विचारपूर्वक देतो. आंध्र प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीला वाटलं होतं की, मंदिरातील दागिने आणि पैसे चोरून तो दारूसाठी पैसे जमवू शकेल (Robbery In Temple). त्यासाठी त्याने मंदिराच्या भिंतीला छिद्र पाडलं. त्याने आत जाऊन देवाचे दागिने चोरले. मात्र पुढे भलतंच घडलं (Funny Video of Thief). तो दागिने घेऊन पळू लागला तेव्हा त्याच छिद्रामध्ये तो अडकला. अखेर त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं.
ही घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधील कांचिली मंडलातील जादुपुडी गावात घडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आर पापा राव असं या 30 वर्षीय चोराचं नाव आहे. केवळ दारूच्या बाटलीसाठी त्याने ही चोरी केली. गावातील येल्लम्मा मंदिराच्या भिंतीला छिद्र करून तो आत शिरला होता. त्याने देवतेला अर्पण केलेले चांदीचे दागिने चोरले आणि त्याच छिद्रातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ज्या छिद्रातून तो सहज आत शिरला, त्याच छिद्रातून बाहेर पडताना तो त्यात अडकला.
चोरट्याने मंदिरातून वीस ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. नंतर सकाळी मंदिर उघडले असता पुजार्याला मंदिराच्या भिंतीला केलेल्या बिळात चोर अडकलेला दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मोठ्या कष्टाने चोरट्याला बाहेर काढलं आणि घटनेबाबत एफआयआर दाखल केली. पत्रकार सूर्या रेड्डी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चोर गावकऱ्यांना आपल्याला बाहेर काढण्यासाठी विनंती करताना दिसत आहे.
या व्यक्तीने चोरीचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. याआधीही त्याने दारूसाठी अनेक वेळा चोऱ्या केल्या आहेत. यापूर्वी एकदा त्याने एका महिलेच्या घरातून गॅस सिलिंडर चोरला होता. त्यावेळीही त्याने केवळ दारूच्या नशेसाठी हे कृत्य केलं होतं. पोलिसांनी जप्त केलेले दागिने पुन्हा मंदिराकडे सुपूर्द केले असून त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी चोरीची अशीच एक मजेशीर घटना समोर आली होती, जेव्हा घरात चोरी करण्यासाठी आलेल्या एका चोराला खिचडी बनवताना पकडण्यात आले होते. चोराला भूक लागली आणि तो स्वयंपाकघरातच अन्न शिजवू लागला. कुकरची शिट्टी वाजल्याने घरातील लोकांना जाग आली आणि चोर पकडला गेला.