नवी दिल्ली 21 मार्च : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Emotional Video Viral) झाला आहे. ज्यामध्ये एक तरुण सैन्यात भरती होण्यासाठी रात्री नोएडाच्या रस्त्यावर धावण्याचा सराव करत आहे. मूळचे उत्तराखंडचे चित्रपट निर्माते विनोद कापरी (Vinod Kapri) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या 19 वर्षीय तरुणाला कारने घर सोडण्याची ऑफरही दिली. मात्र तरुणाने त्यांच्याकडून लिफ्ट घेण्यास नकार दिला. 400 किमी दूर बसून सोबत खेळायचे ऑनलाईन गेम; एकमेकांना न बघताच प्रेमात पडले अन्.. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला त्यांनी तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं. व्हिडिओमध्ये दिसतं की, मुलगा खांद्यावर बॅग घेऊन रस्त्यावरून वेगाने पळत आहे. रात्री 12 वाजता तरुणाला अशा प्रकारे धावताना पाहून विनोद कापरी यांनी त्याला लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. मात्र तरुणाने हसतमुखाने नकार दिला. धावतच आपल्या घरी जाणार असल्याचं त्याने सांगितलं (Teen Runs 10 KM Every Night). कापरी यांनी त्याला विचारलं की तू काय काम करतो? यावर तरुणाने सांगितलं की तो नोएडा सेक्टर-16 येथील McDonalds मध्ये काम करतो. रात्री अशाप्रकारे धावण्याचं कारण विचारलं असता त्या तरुणाने आपल्याला सैन्यात भरती व्हायचं असून कामामुळे सरावासाठी वेळ मिळत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे तो आपली ड्युटी संपवून धावत घरी जातो. त्यामुळे त्याचा धावण्याचा सराव होतो.
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या तरुणाचं नाव प्रदीप मेहरा असून तो मूळचा उत्तराखंडमधील अल्मोडा येथील आहे. यावेळी विनोद कापरी यांनी त्या तरुणाला अनेक प्रश्न विचारले. या तरुणाची उत्तरं ऐकून कापरीही भावूक झाले. तरुणाने सांगितलं की, त्याच्या आईवर उपचार सुरू असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे तो आपल्या भावासोबत राहतो आणि दररोज 10 किलोमीटर धावते.
तरुणाचं बोलणं ऐकून कापरी यांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. शेवटी ‘ऑल द बेस्ट’ म्हणत ते पुढे निघून गेले. कपरी यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 4.3 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.