नवी दिल्ली, 1 जून : अनेकदा हत्तीला किंवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याला राग आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील, परंतु जिराफाला (Giraffe) कधी राग आल्याचं पाहिलंय का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एक जिराफ अतिशय रागात असल्याचं दिसतंय. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचाच जिराफाने पाठलाग केला आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना पाहून जिराफाला राग आल्याचं दिसतंय. तो पर्यटकांच्या (Tourists) जीपचा पाठलाग करतो. जंगली प्राण्यांना अशावेळी राग येतो, ज्यावेळी त्यांना जंगलात एखादा व्यक्ती दिसतो आणि त्यापासून धोका असल्याचं त्याला वाटतं. त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं वाटल्यास, प्राणी मनुष्यावर हल्ला करतात. या व्हिडीओमध्येही असंच काहीसं झाल्याचं दिसतंय. जंगल सफारीसाठी आलेले काही लोक जीपमध्ये बसलेले असल्याचं जिराफाने पाहिल्यानंतर त्याने त्या जीपचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तो जंगलात धूळ उडवत जोरात पळताना दिसतोय. अशाप्रकारे रागात असलेल्या जिराफाला पाहून पर्यटकही घाबरतात आणि ते जीप आणखी जोरात पळवू लागतात. परंतु जिराफ इतक्या रागात असतो, की तो धावत काही सेकंदातच जीपच्या पुढे पोहोचतो.
जिराफ शाहाकारी प्राणी आहे. तो वाघ, सिंहाप्रमाणे माणसाची शिकार करत नसला, तरी तो रागात आपल्या पायांनी, मानेने माणसाला जखमी नक्कीच करू शकतो. जिराफ जीपच्या पुढे जाऊन, पुन्हा उलटा फिरून उभा राहतो. घाबरलेले पर्यटकही जीप रिव्हर्स गियरमध्येही पळवू लागतात.
हा व्हिडीओ द सनने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ केनियातील असल्याचं बोललं जात आहे. 30 मे रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.