10 मे, शिरूर/ रायचंद शिंदे : ‘सैराट’ गर्ल’ आर्चीची बुलेट क्रेझ मागील काळात चांगलीच गाजत आहे. या सिनेमानंतर अनेक पोरींनी बुलेट शिकून घेतल्या असतील. मात्र लग्न मंडपात आपल्या नवरोबला मागे बसून आलेली एक नवरी पुण्याच्या शिरुरमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शितोळे आणि धुमाळ या दोन कुटुंबातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आलाय तो या विवाह सोहळ्याला नवरी मुलीने बुलेटवर नवऱ्याला पाठीमागे बसवून लग्न मंडपात ग्रँड एंट्री केल्यामुळे. शिवाय तिने मराठमोळा साज शृंगारही केला होता आणि ‘या’ नादखुळया सोहळ्यात संपूर्ण वऱ्हाडी मंडळी नवरीला त्या रूपात पाहून अवाक् झाली.
मुलीने बुलेट चालवत थेट नवऱ्यासोबत लग्न मंडपात एन्ट्री घेतली. आणि या लग्न सोहळ्याचे आकर्षण ठरली. या नवरी मुलीला सर्व वाहने चालवता येत असल्याने शेतकरी बापाने लेकीची हौस पुर्ण करत तिला लग्नात भेट म्हणून चक्क एक कार, एक बुलेट आणि दुचाकी दिली आहे. शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली असून मुलगी आणि बापाच्या नात्याला यामुळे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या लग्न सोहळ्याची पंच क्रोशित चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे हा लग्न सोहळा सर्वांचे आकर्षण ठरला आहे.