नवी दिल्ली, 16 मे : मागील एका वर्षापासून देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) पसरला आहे. अशात देशात संपूर्ण लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आलं होतं. लॉकडाउनमुळे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. आता पुन्हा आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असून परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्यात आला. लग्न समारंभावरही अनेक निर्बंध लादण्यात आले. असाच एक व्हिडीओ आयपीएस आधिकारी दीपांशू काबरा यांनी पोस्ट केला आहे, ज्यात पंजाब पोलीस एका नवविवाहित जोडप्याचं स्वागत करत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पंजाब पोलीस बाईकवरुन जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याचं स्वागत करत आहेत. पोलिसांनी या जोडप्याला हार घालत त्यांना आहेर रुपात पैसेही दिले आहेत. पोलिसांच्या या कृत्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, त्यांचा हा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं सांगण्यात येत आहे. तसंच घराबाहेर पडल्यास मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे नियम पाळणं आवश्यक आहे. परंतु अनेक जण कोरोनाच्या नियमांचं पालन करत नसल्याचं चित्र आहे. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत असून अनेक जण मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.
एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र, कोरोना काळात स्वत:चं लग्न झाल्यानंतर कोणत्याही गाजा-वाज्याशिवाय हे जोडपं, कोरोना नियमांचं पालन करत असल्याचं दिसलं. पोलिसांनी त्यांच्या या कृतीचं स्वागत करत, नवविवाहित जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक जण पोलिसांच्या या कृत्यांचं कौतुक करत आहेत.