प्रातिनिधीक फोटो
पाटणा 18 जानेवारी : प्रेमात (Love) माणूस पूर्णपणे आंधला होतो, असं म्हटलं जातं. आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या बिहारमधील (Bihar) असंच एक प्रकरण चर्चेत आहे. यात अरवल येथील एका विवाहित तरुणीने लग्नातील वचनांसोबतच कायद्यालाही फाटा देत आपल्या प्रियकराच्या गळ्यात वरमाळा घातली. हे प्रकरण किंजर ठाणा क्षेत्रातील झुनाठी गावातील आहे. या घटनेत युवतीने घटस्फोट न घेताच आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली (Married Woman Tied Knot With Lover) . युवती उजाला कुमारी हिने गावातीलच एक तरुण बिल्ला कुमार याच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या आधीपासूनच ही तरुणी बिल्ला कुमार याच्यावर प्रेम करत होती. मात्र, घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्याच मुलासोबत लावलं. तिचं लग्न जवळपास दोन वर्षांपूर्वी पालीगंज ठाण्याच्या क्षेत्रात झालं होतं. आता तिला एक बाळही आहे. मात्र, तरीही आपल्या प्रियकरावरील तिचं प्रेम कमी झालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरात राहात होती. यादरम्यान ती लपून आपल्या प्रियकराला भेटत होती. या प्रकरणाबाबत अरवलचे एसपी राजीव रंजन यांनी सांगितलं, की सध्या मला या प्रकरणाबाबत माहिती मिळालेली नाही. हे लग्न तर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने केलं गेलं असेल. संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोघांनी लग्न केल्यानंतर या तरुणीच्या आणि तरुणाच्या घरच्यांमध्ये भरपूर भांडण झालं. वाद वाढतच गेल्याने पोलिसही गावात पोहोचले. पोलिसांनी या भांडणाचं कारण विचारलं असता हे प्रेमप्रकरणावरुन असल्याचं समोर आलं. शनिवारी एका मंदिरात या प्रेमीयुगुलाचं लग्न लावण्यात आलं. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील लोकांसह पोलिसही सहभागी झाले.
आधीपासूनच विवाहित असलेली उजाला कुमारी आपल्या प्रियकरासोबत लग्न करून आता अतिशय आनंदी आहे. तर आपली प्रेयसी परत मिळाल्याने बिल्लाचा आनंदही गगनात मावत नाहीये. दोघांनीही बाळाला आपल्याजवळच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लग्न पाहण्यासाठी आसपासच्या लोकांनीही मोठी गर्दी केली होती. सध्या हे अनोखं लग्न चर्चेचा विषय ठरत आहे.