सोर्स : GOOGLE
मुंबई, 30 जून : इस्लामधर्मियांच्या सणांमध्ये बकरी ईद हा दुसरा सर्वांत शुभ सण मानला जातो. बकरी ईदला ‘ईद-उल-अजहा’ असंही म्हणतात. इस्लाममध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बोकडाचा बळी दिला जातो. इस्लाममध्ये ईदच्या दिवशी बोकडाच्या कुर्बानीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यामुळे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडांच्या किमती प्रचंड वाढतात. विशेषत: ज्या बोकडांच्या अंगावर चंद्रकोरीसारख्या खुणा असतात त्यांना लाखो रुपये किंमत मिळते. राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील एका मेंढपाळाला तर तब्बल एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या मेंढपाळानं ही ऑफर नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू सिंह असं मेंढपाळाचं नाव असून ते तारानगर परिसरात राहतात. त्यांच्याकडील एक कोकरू फक्त तारानगरमध्येच नाही तर आसपासच्या गावातही चर्चेचा विषय बनलं आहे. बकरी ईदनिमित्त या कोकराच्या बदल्यात एक कोटी रुपयांची ऑफर राजू यांना मिळाली होती. कारण, या कोकराच्या अंगावर नैसर्गिकपणे ‘786’ हा अंक उर्दूमध्ये उमटलेला आहे. राजू सिंह यांनी सांगितलं की, मेंढ्याच्या शरीरावरील अंकांचा अर्थ काय आहे हे त्यांना माहीत नव्हतं. मात्र, त्यांनी मुस्लीम समाजातील काही सदस्यांशी सल्लामसलत केली असता त्यांना समजलं की प्राण्याच्या शरीरावर ‘786’ हा अंक दिसत आहे. ‘786’ हा अंक मुस्लिमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. विशेषत: भारतीय उपखंडातील मुस्लिम ‘बिस्मिल्ला इर-रहमान इर-रहीम’ या वाक्प्रचाराऐवजी या अंकाचा वापर करतात. राजू सिंह म्हणाले, “मुस्लिमांसाठी हा अंक फार अर्थपूर्ण असला तरी मी माझं कोकरू विकू इच्छित नाही. कारण, ते मला फार प्रिय आहे. गेल्या वर्षी या नर कोकराचा जन्म झाला आहे. आता लोक त्यासाठी बोली लावत आहेत. काहींनी 70 लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत किंमत देण्याची तयारी दाखवली आहे. पण, मी कोकरू विकायला तयार नाही.” भरघोस बोली लागल्यापासून या कोकराची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याला डाळिंब, पपई, बिंदोला, बाजरी आणि हिरव्या भाज्या खाण्यासाठी दिल्या जातात. सुरक्षेच्या कारणास्तव सिंह यांच्या कुटुंबियांनी हे कोकरू घरात ठेवण्यास सुरुवात केली आहे. हे कोकरू आणि त्याचा मालक दोघेही सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.