नवी दिल्ली 31 : देशात .कोरोनाचा (Coronvirus in India) प्रसार होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. कोरोनानं देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनशैलीत या काळात मोठा बदल झाला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown), विकेण्ड लॉकडाऊन तसंच नाईट कर्फ्यूसारखे नियम लागू केले आहेत. या संपूर्ण काळात शाळादेखील बंद आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसच्या (Online Classes) माध्यमातूनच शिक्षण घ्यावं लागत आहे. मात्र, याच बाब आता एका चिमुकलीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे तक्रार केली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video of Kashmiri Girl) चांगलाच व्हायरल होत आहे. ऑनलाईन क्लासमुळे विद्यार्थ्यांना तासंतास मोबाईल समोर घेऊन बसावं लागतं. मात्र, इतका वेळ मोबाईल घेऊन बसण्याची सवय नसल्यानं त्यांना हे कंटाळवाणं वाटू लागतं. याच पार्श्वभूमीवर काश्मीरच्या या चिमुकलीनं आपली तक्रार पंतप्रधानांना सांगितली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली अवघ्या सहा वर्षांची आहे. व्हिडिओमध्ये ती सवाल करत आहे, की इतकं जास्त काम लहान मुलांना असतं का? मी इतकी लहान आहे, तरी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत माझे क्लास सुरू असतात. इंग्लिश, गणित, उर्दू, कमप्यूटर असे विषयही ती यात सांगत आहे.
पुढे ही चिमुकली म्हणते, की इतकं जास्त काम तर मोठ्या मुलांना असतं. जी सातवी ते दहावीची असतात. मात्र, मी तर खूप लहान आहे आणि मला इतकं काम का दिलं जातं, मोदी जी. मात्र, शेवटी जाताजाता आता काय करायचं? असा सवाल करुन ती व्हिडिओ बंद करते. चिमुकलीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. आतापर्यंत 45 सेकंदाचा व्हिडिओ 32 हजारहून अनेकांनी पाहिला आहे. तर, जवळपास 3 हजार जणांना लाईक आणि 630 जणांनी तो रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेक यूजरनं तिचं कौतुक केलं आहे. इतक्या लहान वयात तिचं असं बोलणं अनेकांना भाळत आहे. तर, काहींना तिला अभ्यासाच महत्त्व समजून सांगितलं आहे. काही यूजर या चिमुकलीच्या मताशी सहमत असून शाळेचे हे तास कमी करण्याची मागणी ते करत आहेत.