आंतरराष्ट्रीय योग दिन
नवी दिल्ली, 21 जून : स्वतःला फीट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करतात. यामध्ये डाएट, जीम, योगा अशा गोष्टी पहायला मिळतात. अशातच आज इंटरनॅशनल योगा डे आहे. त्यामुळे सर्वत्र योगा डे च्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केल्याचं पहायला मिळतायेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण योगा करतात. आज इंटरनॅशनल योगा डेचं औचित्य साधत एका 4 वर्षापासून योगा करणाऱ्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत जी तिच्या योगासनांमुळे चर्चेत आहे. सध्या ती आणि तिच्या आईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. एक तरुणी चार वर्षापासून आपल्या आईला पाहून अप्रतिम योगासने करायला शिकली आहे. आज योगा दिनानिमित्ताने ती आणि तिची आई चर्चेत आली आहे. यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
योगासने करणारी मुलगी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहते आणि आईला पाहून तिला ही सवय लागली. तिची आई देखील गेल्या 26 वर्षांपासून योगाभ्यास करत असून वयाच्या 45 व्या वर्षीही त्यांच्या शरीराची लवचिकता पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुलीचं नाव मिनी कॅस्परझॅक आहे, जी लहानपणापासून तिची आई लॉरा कॅस्परझॅकसोबत योगा करते. लॉरा एक योग प्रशिक्षक देखील आहे आणि मुलीने वयाच्या 4 व्या वर्षी तिच्याकडून योगाचे धडे घेतले. ती शिर्षासन, मयुरासन आणि चक्रासन यांसारखी कठीण योगासने तरुण वयात सहज करू शकतात.
मिनी आता 13 वर्षांची आहे आणि तिच्या लवचिक शरीरामुळे तिने नृत्य आणि जिम्नॅस्टिकमध्येही अनेक पदके जिंकली आहेत. ती तिच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करत असते. 2014 मध्ये सोशल मीडियावर या मुलीचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्यामुळे जगभरात चर्चेचा विषय बनला होता. आता पुन्हा एकदा ती योगा दिनानिमित्त चर्चेत आली आहे.