व्हायरल
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : तुर्की आणि सीरियातील नागरिकांना निसर्गाचं रौद्र रुप बघायला मिळत आहे. सोमवारी (6 फेब्रुवारी) याठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्की आणि सीरियाच्या सीमेजवळ होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. दोन्ही देशांतील मृतांची संख्या 20 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. या भूकंपानंतर येथील हजारो लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालीही जीवन-मरणाचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची तीव्रता दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका सात वर्षांच्या सीरियन मुलीच्या फोटो आणि व्हिडिओचादेखील समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या या सात वर्षांच्या मुलीनं 17 तास आपल्या लहान भावाचं संरक्षण केलं. ‘द ट्रिब्युन’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. युनायडेट नेशन्सचे (यूएन) प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनी आणि इतर सोशल मीडिया युजर्सनी हे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. सफा यांनी आपल्या ट्विटमध्यं म्हटलं आहे. “या सात वर्षाच्या मुलीने आपल्या लहान भावाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला 17 तास ढिगाऱ्याखाली सुरक्षित ठेवलं.” या मुलीनं मोठ्या बहिणीची जबाबदारी लक्षात घेऊन आपल्या लहान भावाला जीवापाड जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत मदत पोहचेपर्यंत तिनं त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुरक्षित ठेवलं.
तुर्की आणि सीरियामधील या धाडसी मुलांचे, सकारात्मकता, बंधुता आणि प्रेमाचा प्रसार करणारे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून एका नवजात बाळाला बाहेर काढतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तुर्कीच्या सीमेवर वसलेल्या आफरिन शहरातील ही घटना आहे. या बाळाच्या आईनं भूकंपादरम्यान त्याला जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला. बचाव पथकाचं लक्ष जाईपर्यंत धूळ आणि रक्तानं माखलेलं हे बाळ मातीच्या ढिगाऱ्याखाली पडलेलं होतं. बचाव पथकानं बाळाला बाहेर काढून वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी त्याला डॉक्टरांकडे सोपवलं.
बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजून 17 मिनिटांनी तुर्कीच्या दक्षिणेकडील कहरामनमारास प्रांतात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर काही मिनिटांनी देशाच्या दक्षिणेकडील गाझिआनटेप प्रांतात 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि दुपारी एक वाजून 24 मिनिटांनी पुन्हा 7.6 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. यामुळे तुर्कीतील हाते प्रांत आणि सीरियातील अलेप्पो शहरात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. तर लेबनान, इस्रायल आणि सायप्रसमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.