नवी दिल्ली 20 जानेवारी : धूम्रपान करणं आरोग्यासाठी हानिकारक (Smoking Injurious To Health) आहे, हे आपण अनेकदा ऐकलं असेल. स्वतः सिगरेट बनवणाऱ्या कंपन्याही बॉक्सवर याविषयीची माहिती देतात. सिगरेट आणि दारू (Effect of Alcohol and Cigarette on Body) यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, याचा केवळ शरीरावरच नाही तर आपल्या आसपासच्या वस्तूंवरही परिणाम होतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सोशल मीडियावर एका महिलेनं घरात सिगरेट पिल्यामुळे झालेलं नुकसान लोकांना दाखवलं. हे पाहून कदाचित कोणीच घरात स्मोकिंग करणार नाही.
कँडिस लेइ क्लार्क नावाच्या या महिलेनं आपल्या टिकटॉक अकाऊंटवर सिगरेट पिल्यामुळे घराच्या झालेल्या अवस्थेचे फोटो शेअर केले आहेत. महिलेनं आपल्या आई-वडिलांच्या घराची झालेली अवस्था लोकांना दाखवली. कँडिसचे आई-वडील घराचा दरवाजा बंद करून दररोज दोन पॅकेट सिगरेट पित असे. यामुळे त्यांच्या शरीराचं तर नुकसान झालंच. मात्र, सोबतच धुरामुळे घराच्या भिंतीही काळ्या झाल्या.
व्हिडिओ बनवून महिलेनं आपल्या आई-वडिलांच्या घराच्या भिंती कापडाने पुसून त्यावर साचलेला काळा थर काढला. हे सर्व सिगरेटच्या धुरामुळे झालं होतं. महिला अनेक दिवसांनी आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली, तेव्हा तिने पाहिलं की घराच्या भिंती काळ्या झाल्या आहेत. सुरुवातीला तर तिला याचं कारण समजलं नाही. यानंतर तिला समजलं की हे धुरामुळे झालं आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आई-वडिलांच्या सिगरेटच्या व्यसनामुळे भिंतींची ही अवस्था झाली आहे.
कँडिसने साफसफाई करत आपला व्हिडिओ बनवला आणि लोकांना आवाहन केलं की कधीही घरात सिगरेट पिऊ नका. याचा हा परिणाम होतो. लोकांनीही या पोस्टवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. अनेकांनी लिहिलं की भिंतीची अशी अवस्था झाली आहे, तर माणसाच्या शरीराची काय होत असेल, याचा विचार करा. धुरामुळे झालेला हा परिणाम पाहून लोक हैराण झाले आहेत.