पर्यटकांच्या गाडीसमोर येऊन थांबला चित्ता
नवी दिल्ली, 13 जून : अनेकांना वन्य जीवनाविषयी जाणून घेण्यामध्ये खूप रस असतो. यासाठी ते जंगल सफारीसाठीही जातात. जेणेकरुन प्राण्यांना जवळून पाहता येईल. जंगालमध्ये अनेक धोकादायक, भयानक प्राणी असतात, कोण कधी हल्ला करेल किंवा कशामुळे संतप्त होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे जंगल सफारी जेवढी आश्चर्यकारक वाटते तेवढीच ती धोकादायकही आहे. नुकताच जंगल सफारीदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जंगल सफारीला पर्यटक जाताच त्यांच्या स्वागतासाठी चित्ता आल्याचं सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. पर्यटक चित्त्याच्या एवढे जवळ होते की पाहूनच अंगावर काटा येईल. तरीही पर्यटक न घाबरता त्याच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसले. भुवया उंचावणारा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पर्यटकांची गाडी जंगलाच्या मधोमध उभी आहे. त्यांच्या समोर भुकेलेला चित्ता उभा आहे. चित्ता त्यांच्या गाडीकडे येतो आणि एकटक त्यांच्याकडे बघत उभा राहतो. पर्यटकांच्या हातात मांसाचा तुकडा आहे. ते चित्तासोबत मजामस्ती करु लागतात. त्याला पाहून ‘मियाऊ-मियाऊ’ आवाज करतात. चित्तादेखील कान देऊन त्यांना ऐकतो.
पर्यंटक नंतर गाडीचा दरवाजा उघडतो आणि बंद करतो. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. नंतर ते भुकेलेल्या चित्त्याला मांसाचा तुकडा देतात. तो ते घेऊन निघून जातो. @nowthisnews नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 28 सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच धोकादायक आणि श्वास रोखून धरणारा आहे. पर्यटकांचं नशीब चांगलं होतं म्हणून या धोकादायक प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक वेळा पाहिला जात आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहे. जंगल सफारीदरम्यानचे असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. कधी कधी हल्ल्यांचेही व्हिडीओ समोर येतात जे खूप थरारक असतात.