धोनीचा जबरा फॅन
नवी दिल्ली, 04 जून : भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी लाखो लोकांच्या हृदयाची धडकन आहे. त्याच्या चाहतावर्ग काही कमी नाही. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारे, त्याच्या एका झलकसाठी तासनतास वाट पाहणारे असे त्याचे क्रेझी फॅन आहेत. त्यामुळे त्याच्या फॅनविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर तर त्याच्या चाहत्यांविषयीदेखील बातम्या झपाट्याने व्हायरल होतात. नुकताच धोनीचा आणखी एक जबरा फॅन पहायला मिळाला. त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. सोशल मीडियावर सध्या महेंद्रसिंग धोनी म्हणजेच माहीच्या जबऱ्या फॅनची चर्चा रंगली आहे. धोनीच्या एका चाहत्याने त्याच्या लग्नाच्या कार्डवर स्वतःचा फोटो लावण्याऐवजी धोनीचा फोटो लावला होता. त्याची ही हटके लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेमध्ये धोनीच्या फोटोसह जर्सी क्रमांक आणि त्याचे नाव छापण्यात आले आहे. छत्तीसगडमधील एका व्यक्तीने केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. आतापर्यंत, वधू-वरांच्या नावांव्यतिरिक्त, तुम्ही लग्नाच्या कार्डावर त्यांच्या नातेवाईकांच्या नावांसह संपूर्ण ठिकाण आणि विवाह विधीची तारीख पाहिली असेल. मात्र एखाद्या क्रिकेटरचा फोटो असलेली लग्नपत्रिका कधी पाहिली का? धोनीचा फोटो असलेली ही लग्नपत्रिका सध्या इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. @itsshivvv12 नावाच्या ट्विटर अकाउंटवर ही पत्रिका शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, धोनीच्या या चाहत्याचे नाव दीपक पटेल असून तो मिलुपारा येथील कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी आहे. यासोबतच त्याने एमएस धोनीला त्याच्या मोठ्या आणि खास दिवसासाठी आमंत्रण देणारे कार्डही पाठवले आहे. दीपक लहानपणापासून महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानत असल्याचे सांगितले जात आहे. तसे, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या चाहत्याने धोनीची अशी क्रेझ दाखवली असेल. याआधीही अनेक चाहत्यांची धोनीविषयी क्रेझ पाहायला मिळाली आहे.