वेबसीरिजमुळे सापडली हरवलेली लेक
नवी दिल्ली, 19 मे : आपण अनेक चित्रपट व सीरिज पाहतो. या पैकी काही कथानकं सत्य घटनेवर आधारित असतात. तर, काही कथा किंवा घटना फिल्मी वाटतात. त्या चर्चेत आल्यानंतर त्यावर चित्रपट किंवा सीरिज बनवली जाते. अशाच एका फिल्मी कहाणी व त्यातील रंजक वळणांबद्दल आज जाणून घेणार आहोत. सहा वर्षांपूर्वी एका मुलीचं अपहरण झालं होतं. तेव्हापासून तिचे वडील तिचा शोध घेत होते. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. वडिलांचा संघर्ष पाहून सगळेच भावूक झाले होते. त्यानंतर त्यांची कथा नेटफ्लिक्सवरील शोमध्ये दाखवण्यात आली. आता इतक्या वर्षांनंतर या वडिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण त्यांची हरवलेली मुलगी सापडली आहे. हे फिल्मी प्रकरण अमेरिकेतील कॅरोलिना इथलं आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.
‘इंडिपेंडंट यूके’च्या रिपोर्टनुसार, कायला अनबेहौन 9 वर्षांची होती जेव्हा तिची आई हीथर अनबेहॉन तिला तिच्यासोबत घेऊन कुठेतरी गेली होती. 4 जुलै 2017 रोजी कायला तिच्या आईला भेटायला गेली होती. जिच्याकडे तिची पूर्ण कस्टडी नव्हती, पण तिला मुलीला भेटण्याचा अधिकार होता. तर कायलाच्या वडिलांकडे तिची पूर्ण कस्टडी होती. कायलाचे वडील तिला तिच्या आईच्या घरी घ्यायला गेले तेव्हा त्यांना तिथं कोणीच दिसलं नाही. अनेक वर्षे शोध मोहीम सुरू होती. तिला शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण ती सापडली नाही. त्यानंतर प्रकरण थोडं थंडावलं. पण कायला कुठे गेलीये, याबद्दलचं रहस्य कायम होतं. त्यानंतर ही कहाणी नेटफ्लिक्सच्या ‘अनसॉल्व्ह्ड मिस्ट्रीज’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आली होती. त्याचे टायटल ‘अबडक्टेड बाय अ पॅरेंट’ म्हणजेच ‘पालकाकडून अपहरण’ असं होतं. गेल्या महिन्यात, NCMEC (नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन) द्वारे एज-प्रोग्रेशन फोटो प्रसिद्ध करण्यात आले. यात 15 वर्षांची झाल्यावर कायला आता कशी दिसत असेल, हे दाखवण्यात आलं होतं. हेही वाचा - कुत्र्याच्या पिल्लाला उचलून आपटलं, तरुणाचं संतापजनक कृत्य, पाहा Video फोटो प्रसिद्ध झाल्यावर एका स्टोअर मालकाने प्रशासनाला या बेपत्ता मुलीबाबत माहिती असल्याचं सांगितलं. त्याने कायलाला तिथल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये पाहिलं होतं आणि नेटफ्लिक्स शोमुळे तिला ओळखलं होतं, अशी माहिती पोलिसांना फोन करून दिली. मुलगी सापडल्यानंतर तिची आई हीथर हिला अटक करण्यात आली. तिच्यावर मुलीचं अपहरण केल्याचा आरोप आहे. कायलाचे वडिल रायन यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ते मुलगी बेपत्ता झाल्यावर ‘Bring Kayla Home’ नावाचं फेसबुक पेज चालवत होते.