'ती' पोस्ट होतेय व्हायरल
मुंबई, 08 एप्रिल: एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरचा पगार सध्याच्या काळात लाखांच्या घरात सहज असतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना चांगला पगार मिळतो; पण तुम्हाला जाणून आश्यर्च वाटेल की, जवळपास 16 वर्षांपूर्वी एमबीबीएस झालेल्या डॉक्टरचा पगार हा एखाद्या शिपायाला मिळणाऱ्या पगाराएवढा होता! विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय. अपोलो हॉस्पिटल्सचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘16 वर्षांपूर्वी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतरही मला 9,000 रुपये पगार मिळत होता. हा पगार तेव्हाचा आहे, जेव्हा मला डीएमची पदवी घेऊनसुद्धा 4 वर्षं पूर्ण झाली होती. 2004 मध्ये माझा पगार महिन्याला 9000 रुपये होता. सीएमसी वेल्लोर इथल्या प्राध्यापकांना पाहून मला नेहमी वाटायचं, की डॉक्टरांचं आयुष्य कमी खर्चिक असावं.’ डॉक्टरांच्या ट्विटवर कमेंट्सचा पाऊस डॉ. सुधीर कुमार यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. अनेक युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या काळात पीएचडीसाठी आठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत होती, असं एका युझरने म्हटलं आहे. आजच्या काळात कमी पगारात जगणं सोपं नाही, अशीही एक कमेंट या पोस्टवर आली आहे. आणखी एका युझरने लिहिलं आहे, की, आज खासगी हॉस्पिटलकडून डॉक्टर आणि रुग्ण अशा दोघांची लूट केली जातेय. म्हणून केलं होतं ट्विट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एका तरुणाच्या पोस्टला उत्तर देताना हे ट्विट केलं होतं. या तरुणानं पोस्ट केली होती की, ‘तरुण व्यावसायिकाला समाजसेवा करणं खूप कठीण असतं. जेव्हा तो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो, तेव्हा ते अधिक कठीण असतं.’ या पोस्टला उत्तर देताना सुधीर कुमार यांनी एक ट्विट केलं होतं. ते वेगानं व्हायरल झालं. तसंच त्यानंतर डॉ. सुधीर कुमार यांनी पुन्हा एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की ‘मी त्या पगारावर खूश होतो; मात्र मला सरकारी कार्यालयात शिपायाइतकाच पगार मिळतो, हे पाहून माझ्या आईला वाईट वाटायचे. कारण माझ्या आईने मला शाळेत 12 वर्षं कठोर परिश्रम करताना पाहिलं होतं. यानंतर मी 12 वर्षं एमबीबीएस, एमडी आणि डीएम करण्यासाठी वेळ दिला होता.’ दरम्यान, सध्या डॉक्टरांच्या पगाराचे आकडे खूपच चांगले आहेत; पण अवघ्या 16 वर्षापूर्वी डॉक्टरांचा पगार पाचअंकीसुद्धा नव्हता, हेच डॉ. सुधीर कुमार यांच्या ट्विटवरून दिसून येतंय.