वॉशिंग्टन,10 जानेवारी: तेहरान(Tehran) एअरपोर्टवर बुधवारी (8 जानेवारी) सकाळी यूक्रेनचे एक विमान क्रॅश (Ukrainian Plane Crash) झाले होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला. आता या घटनेबाबत नवा खुलासा समोर आला आहे. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे यूक्रेनचे विमान क्रॅश झाले, असा दावा अमेरिकेने केला होता. आता कॅनडानेसुद्धा युक्रेनच्या प्रवासी विमानाच्या दुर्घटनेत इराणची चूक असल्याचे म्हटले आहे. इराणकडून अजाणतेपणे चूक झाल्याचे कॅनडाने म्हटले आहे. तेहरानपासून 46 किलोमीटर अंतरावर झालेल्या या दुर्घटनेत कॅनडातील 63 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, इराणने विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आरोप फेटाळून लावत कॅनडाकडे गुप्तचर संस्थेचा अहवाल मागितला आहे. समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा खळबळजनक VIDEO आता या विमान दुर्घटनेचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. अमेरिकन मीडिया ग्रुप ‘सीएनएन’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला इराणहून नारिमन गारिब नामक व्यक्तीने एक व्हिडिओ पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये आकाशात मोठा स्फोट होताना दिसतो. या व्हिडिओत एक बिल्डिंग देखील दिसते. ही बिल्डिंग तेहरानच्या पारंद भागात आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओचा जोरदार चर्चा सुरू आहे. पाहा व्हिडीओ…
अमेरिकेने केला हा दावा.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, युक्रेन विमान दुर्घटनेला इराण जबाबदार असू शकते. यावेळी ट्रम्प यांनी थेट इराणचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, दुसऱ्या पक्षाकडून कोणीतरी चूक केली आहे. काही लोक म्हणत आहेत की तांत्रिक बिघाड आहे. पण मला वाटते की हा प्रश्नच नाही. चुकून झाले असेल. दरम्यान, इराण-अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर पुन्हा इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर डझनभर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने यात 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली होती.