पाणबुडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले पाच जण कोण?
दिल्ली, 23 जून : सर्वात प्रसिद्ध जहाजांपैकी एक असलेलं टायटॅनिक पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रविवारी पाच व्यक्ती सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीतून अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. आता या बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले असून त्यातील पाचही व्यक्तींना मृत घोषित केलं गेलं आहे. टायटनमधील प्रवाशांमध्ये ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा समावेश होता. या सर्व व्यक्ती आपल्या धाडसी स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या, असं म्हटलं जात आहे. ओशनगेट या सबमर्सिबल विकसित करणाऱ्या कंपनीनं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्या निवेदनात म्हटलं आहे की, “ही माणसं खरी संशोधक होती. साहसी वृत्ती हा त्यांच्यामधील एक समान दुवा होता. जगातील महासागरांचं निरीक्षण आणि संरक्षण करण्याची तीव्र उत्कट इच्छा त्यांच्या मनात होती. या दु:खद काळात आम्ही या पाच व्यक्तींच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत.” बेपत्ता पाणबुडीचे झाले तुकडे, 5 जणांचा मृत्यू; रोबोटने शोधले अवशेष, नेमकं काय घडलं? स्टॉकन रश ब्रिटिश व्यावसायिक असलेल्या स्टॉकन रश यांनी 2009 मध्ये ओशनगेट ही कंपनी स्थापन केली. महासागराच्या पृष्ठभागाखाली 20 हजार फुटांपर्यंत प्रवास करू शकणार्या सबमर्सिबलची (पाणबुडी) निर्मिती करण्याचं काम ही कंपनी करते. रश हे ओशनगेटचे सीईओ होते. ओशन गेटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, स्टॉकन रश यांना जाणीव होती की, खासगी उद्योग निधी आणि आधुनिक सामग्रीचा वापर यामुळे खोल महासागरांचा शोध घेण्याच्या आपल्या क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. शिवाय, खर्चात लक्षणीय घट होऊ शकते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात मोठी उडी घेतली होती. 1981 मध्ये, वयाच्या 19 व्या वर्षी रश हे जगातील सर्वात तरुण जेट ट्रान्सपोर्ट-रेट केलेले पायलट बनले होते. त्यांच्या आत्मचरित्रातील नोंदीनुसार, त्यांनी कैरो, मुंबई आणि झुरिचसारख्या ठिकाणांवरून उड्डाण केलं होतं. त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून एरोस्पेस इंजिनीअरिंगची डिग्री आणि यूसी बर्कले येथून बिझनेस मास्टर्स डिग्री घेतली होती. 1989 मध्ये, त्यांनी स्वतःचे प्रायोगिक विमान विकसित केलं. सोनार सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोल्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच सिएटलमधील ‘द म्युझियम ऑफ फ्लाइट’मध्ये त्यांनी बोर्ड आणि डेव्हलपमेंट टीम्समध्येदेखील काम केलं होतं. हमिश हार्डिंग हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन या विमान विक्री आणि कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्ष होते. नासाचे निवृत्त अंतराळवीर टेरी व्हर्ट्स यांनी एनपीआरला सांगितलं की, त्यांचे मित्र असलेले हार्डिंग चिकित्सक आणि शोधक वृत्तीचे होते. हार्डिंग यांनी 2019 मध्ये पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती सर्वात वेगवान उड्डाण करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. ज्यामध्ये टेरी व्हर्ट्स क्रू मेंबर म्हणून हार्डिंग यांच्या सोबत होते. हार्डिंग यांनी महासागराच्या खोल प्रदेशात क्रूड जहाजाद्वारे सर्वात जास्त कालावधीसाठी आणि सर्वात लांब अंतर प्रवास करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील मोडलेला आहे. यापूर्वीही टायटॅनिकच्या अवशेषांना दिली होती भेट; त्या पर्यटकांचा कसा होता अनुभव? शहजादा दाऊद पाकिस्तानी ऊर्जा गुंतवणूक कंपनी, एनग्रो आणि गुंतवणूक आणि होल्डिंग फर्म, दाऊद हर्क्युलस कॉर्प या दोन कंपन्याचे शहजादा दाऊद हे उपाध्यक्ष होते. वस्त्रोद्योग, खते, खाद्यपदार्थ आणि ऊर्जा यासारख्या उद्योगांमधील कंपन्यांचं विलीनीकरण आणि अधिग्रहण करण्यात ते प्रवीण होते. या व्यतिरिक्त त्यांनी विविध कंपन्या आणि संस्थाच्या बोर्डमध्ये काम केलेलं आहे. ज्यात SETI इन्स्टिट्युट, नासानं निधी दिलेली एक ना-नफा संस्था आणि प्रिन्स चार्ल्सची धर्मादाय संस्था, प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. दाऊद यांनी यूकेमधील बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी आणि फिलाडेल्फिया विद्यापीठातून (आता थॉमस जेफरसन विद्यापीठ म्हणून ओळखले जाते) ग्लोबल टेक्सस्टाईल मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्याच्या पश्चात पत्नी क्रिस्टिन आणि मुलगी अलिना असा परिवार आहे. सुलेमान दाऊद शहजादा दाऊदचा मुलगा, 19 वर्षीय सुलेमान हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्यानं नुकतेच स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मेजरचं पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं. पॉल-हेन्री नार्गोलेट नार्गोलेटचा जन्म फ्रान्समधील कॅमोनिक्स येथे झाला होता. आपल्या कुटुंबासह 13 वर्षे ते आफ्रिकेत राहिले होते. नंतर वयाच्या 16 व्या वर्षी ते पुन्हा फ्रान्सला परतले होते. जहाजांबाबत असलेलं ज्ञान आणि कौशल्यामुळे पॉल-हेन्री नार्गोलेट यांना ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हटलं जाई. त्यांनी फ्रेंच नौदलात 22 वर्षे सेवा केली होती. सेवेच्या शेवटी त्यांना कमांडरपदही मिळालं होतं. ते 1986 मध्ये नौदलातून निवृत्त झाले. त्यानंतर, त्यांनी ‘फ्रेंच इन्स्टिट्युट फॉर रिसर्च अँड एक्स्प्लॉयटेशन ऑफ द सी’ येथे दोन डीप-सी सबमर्सिबलची देखरेख केली. तिथे असताना, त्यांनी 1987 मध्ये टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत फर्स्ट रिकव्हरी डाईव्ह केली होती. टायटॅनिकचा इतिहास जतन करण्यासाठी पाण्याखाली संशोधन करणारी कंपनी ‘RMS Titanic Inc.’ आणि प्रदर्शनं व इतर मनोरंजन साहित्य पुरवणारी कंपनी ‘E/M Group’ या कंपन्यांचे ते संचालक होते. नार्गोलेट आपल्या कारकिर्दीत टायटॅनिक जहाजापर्यंत 37 वेळा जाऊन आलेले होते. याशिवाय त्यांनी, जहाजाच्या हुलच्या 20-टन भागासह त्याच्या 5 हजार कलाकृतींच्या पुनर्प्राप्तीच्या कामावर देखरेख केली होती.