मॉस्को, 23 नोव्हेंबर : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुकीत (US presidential election 2020) पराभव झाल्यानंतर देखील तो स्वीकारण्यास नकार दिला आहे. कायदेशीर लढाईची भाषा केली असून बायडन यांचा नव्हे आपलाच विजय झाल्याचं ते अजूनही सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं एक महत्त्वपूर्ण वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ‘जो बायडन (Joe Biden) यांना आम्ही अद्याप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मानत नाही’, असं पुतिन म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा असल्याची केस दाखल केली होती. ती पेनसिल्व्हेनियामध्ये रविवारी कोर्टाने रद्द केली तर जॉर्जियामध्येदेखील त्यांना दुसऱ्यांदा मतमोजणीसाठी अर्ज करावा लागला आहे. तिथेही बायडन यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नाटकानंतर आता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या नवीन विधानामुळे जग थक्क झालं.भारतासह जगातल्या बहुतेक राष्ट्रांनी जो बायडन यांचं अभिनंदन केलं. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याबद्दल मोदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण “सध्या जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून शुभेच्छा देणं बरोबर नाही. रशिया त्यांना सध्या अमेरिकेचे प्रमुख मानत नाही”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. “आम्ही कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्षाबरोबर चांगले संबंधित प्रस्थापित करायला, काम करण्यास तयार आहोत. परंतु जो बायडन यांच्या विजयाच्या दाव्यावर विश्वास ठेवायला अजून वेळ आहे”, असंही पुतिन म्हणाले. अमेरिकेच्या जनतेने ज्या नेत्यावर विश्वास दाखवला आहे त्याच्याबरोबर आम्ही काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी रशियन स्टेट टीव्हीशी बोलताना सांगितलं. ‘कोणत्याही उमेदवाराचा विजय तेव्हाच होतो, ज्यावेळी विरोधकांनी देखील त्याला विजयी मानले असेल. तसेच त्याचा विजय हा अधिकृतरीत्या आणि कायदेशीर पद्धतीने घोषित केला गेला असेल तेव्हाच उमेदवाराला विजयी मानता येते’, असं रशियाचे सर्वेसर्वा असणारे पुतिन म्हणाले. रशियावर आरोप जो बायडन यांचा विजय मान्य करण्यास नकार दिलेल्या जगभरातील काही नेत्यांमध्ये पुतिन यांचा समावेश आहे. 2016 मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप आणि हॅकिंग केल्याचा आरोप रशियावर करण्यात आला होता. त्यामुळे बायडन सत्तेवर आल्यानंतर रशियाविरोधात धोरण राबवण्याची भीती रशियाला आहे. ट्रम्प यांचे फुसके दावे न्यायालयात फुस्स ट्रम्प निवडणुकीतील निकाल मानायला तयार नाहीत. त्यांनी राज्यातील कोर्टांमध्ये खटले दाखल केले आहेत. त्यांनी आपले हे प्रयत्न वेगवान केले असून अनेक राज्यांमध्ये त्यांचे खटले रद्द केले आहेत. ट्रम्प यांच्या आरोपांना कोणताही आधार नसून त्यांचे आरोप निराधार असल्याने हे खटले रद्द करण्यात आले आहेत. जाणकारांच्या मते निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नसून ट्रम्प यांचे हे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. या आठवड्यात एकाच दिवसात ट्रम्प यांनी तीन राज्यांतील विजयी उमेदवारांची प्रमाणपत्र रद्द करण्यासंबंधी दाखल केलेला खटला रद्द झाला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अरिझोनमध्ये गुरुवारी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराने विजयी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जो खटला दाखल केला होता तो रद्द केला आहे. तर दुसरीकडे जॉर्जियामध्ये देखील ही मागणी न्यायाधीशांनी रद्द केली आहे. तर मिशिगनमध्ये ट्रम्प यांनी आपला हा खटला गुरुवारी मागे घेतला आहे. तर पेनसिल्व्हेनियामध्येदेखील ट्रम्प यांना झटका बसला आहे.