**इस्लामाबाद 13 मार्च :**पाकिस्तानने शनिवारी म्हटलं की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पडलेल्या क्षेपणास्त्राच्या (India accidentally fires Missile into Pakistan) “अपघाती गोळीबारा"बद्दल भारताच्या “सरळ स्पष्टीकरणा"वर ते समाधानी नाहीत. या घटनेशी संबंधित योग्य तथ्ये शोधण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त चौकशीची मागणी केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, पाकिस्तानने भारताच्या पत्र माहिती कार्यालयाच्या संरक्षण युनिटच्या प्रेस स्टेटमेंटची दखल घेतली आहे. ज्यात 9 मार्च रोजी “तांत्रिक बिघाडामुळे” पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय क्षेपणास्त्र पडल्याचं सांगितलं गेलं आणि खंत व्यक्त केली आहे. तसंच उच्चस्तरीय ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने सांगितलं की, या घटनेमुळे सुरक्षा प्रोटोकॉल आणि अनधिकृत क्षेपणास्त्र प्रक्षेपणाविरूद्ध तांत्रिक सुरक्षेबाबत अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतात. “एवढी गंभीर बाब भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सोप्या स्पष्टीकरणाने सोडवली जाऊ शकत नाही,” असं त्यात म्हटलं आहे. काही प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
परराष्ट्र कार्यालयाने म्हटलं आहे की, क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर अंतर्गत न्यायालयीन चौकशी करण्याचा भारताचा निर्णय पुरेसा नाही. पाकिस्तानने या घटनेशी संबंधित तथ्य तपासण्यासाठी संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, “भारताने अपघाती क्षेपणास्त्र प्रक्षेपण रोखण्यासाठी उपाययोजना आणि प्रक्रिया तसंच या घटनेची विशेष परिस्थिती स्पष्ट करावी.” पाकिस्तानच्या हद्दीत पडलेल्या क्षेपणास्त्राचा प्रकार आणि वैशिष्ट्ये भारताने स्पष्टपणे सांगावीत, असं त्यात म्हटलं आहे. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू परिसरात पडले होते. नागरिकांच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या एका भागात पडल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अत्यंत खेदजनक आहे, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. “तांत्रिक बिघाडामुळे, 9 मार्च रोजी नियमित देखभाल दरम्यान एक क्षेपणास्त्र चुकून उडालं. भारत सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली असून उच्च स्तरीय कोर्ट ऑफ इनक्वायरीचे आदेश दिले आहेत” चुकून डागलेल्या क्षेपणास्त्राच्या उड्डाणाचा मार्ग आणि अखेर ते क्षेपणास्त्र पाकिस्तानात कसं घुसलं, याबद्दल जाणून घ्यायचं असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.. हे क्षेपणास्त्र स्व-विनाश यंत्रणेने सुसज्ज आहे का आणि असं असेल तर यात ते अयशस्वी का झालं हेदेखील पाकिस्तानाने विचारलं. यासोबतच नियमित देखरेखीखाली ही क्षेपणास्त्रे सोडण्यासाठी तयार ठेवण्यात आली होती का, असाही सवाल पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने असा सवाल केला की, “क्षेपणास्त्राच्या अपघाती प्रक्षेपणाबद्दल पाकिस्तानला तात्काळ माहिती देण्यात भारत का अयशस्वी ठरला? पाकिस्तानने या घटनेची घोषणा करण्याची आणि स्पष्टीकरण मागेपर्यंत ते कबूल करण्याची वाट का पाहिली?” पाकिस्तानने म्हटलं आहे की संपूर्ण घटना गंभीर स्वरूपाच्या अनेक त्रुटी आणि भारताच्या सामरिक शस्त्रास्त्रांच्या हाताळणीतील तांत्रिक त्रुटी दर्शवते. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला आण्विक वातावरणातील गंभीर स्वरूपाची ही घटना गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे आणि या प्रदेशात धोरणात्मक स्थिरता वाढविण्यासाठी आपली योग्य भूमिका बजावली आहे.