लंडन, 07 नोव्हेंबर: पंजाब नॅशनल बँके(PNB)ची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याची जामीन याचिका पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. जामीन याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नीरव मोदी संतप्त झाला. भर कोर्टात मोदीने धमकीच दिली की जर मला भारताकडे सोपवण्यात आले तर मी आत्महत्या करेन. मोदीने कोर्टाला असे देखील सांगितले की तुरुंगात 3 वेळा मला मारहाण करण्यात आली आहे. अर्थात मोदीच्या या नौटंकीचा कोर्टावर कोणताही परिणाम झाला नाही. या सर्व प्रकारानंतर देखील कोर्टाने त्याची जामीन याचिका फेटाळून लावली. नीरव मोदीला बुधवारी वेस्टमिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सादर करण्यात आले होते. कोर्टात मोदीचा वकील हुगो कीथ क्यूसी देखील होते. मोदीने आतापर्यंत पाच वेळा जामीन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टाला नेहमी चुकीची माहिती देण्यात आल्याचे मोदीने कोर्टात सांगितले. तुरुंगात मोदीला दोन वेळा मारहाण देखील करण्यात आली आणि काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडल्याचे मोदीच्या वकीलाने कोर्टात सांगितले. मंगळवारी सकाळी तुरुंगातील दोन कैद्यांनी नीरव मोदीला मारहाण केली. या प्रकरणी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही. सुनावणी दरम्यान नीरवने कोर्टाला सांगितले की, जर मला भारताकडे सोपवले तर मी आत्महत्या करेन. भारतात चालवला जाणारा खटला निष्पक्ष असणार नाही. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मोदीला 19 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्याला सद्या दक्षिण-पश्चिम लंडन येथील वैंड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले आहे. भारत सरकारने विनंती केल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली होती. VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, ‘या’ नेत्याने केला मोठा खुलासा