नवी दिल्ली, 26 मार्च : नेपाळमध्ये पर्यटक आणि माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी येण्याऱ्या गिर्यारोहकांमुळे पर्यटनाला चालना मिळते. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मिळतात. मात्र गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे नेपाळमधील पर्यटन व्यवसायाला मोठी झळ पोहोचली आहे. त्यात क्वारंटाईनचे नियम कडक असल्याने अनेक पर्यटक आणि गिर्यारोहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. मात्र आता नेपाळ सरकारने पर्यटक आणि गिर्यारोहकांना आकर्षित करण्यासाठी क्वारंटाईनच्या नियमात शिथिलता आणली आहे. या निर्णयामुळे नेपाळमध्ये गेल्या वर्षभरापासून ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. नेपाळमध्ये येणाऱ्यांना लस घेतल्याचा पुरावा आणि निगेटिव्ह पीसीआर टेस्टचा अहवाल घेऊन यावा लागणार आहे. हे पुरावे नसतील तर कोरोना चाचणी करणं अनिवार्य असणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत आता पर्यटकांना क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. यापूर्वी पर्यटक आणि गिर्यारोहकांना 7 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणं बंधनकारक होतं. ‘या निर्णयामुळे ज्या गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट चढाईची योजना पुढे ढकलली होती, त्यांना फायदा होणार आहे.’, असं मत नेपाळ पर्यटन विभागाच्या डायरेक्टर मिरा आचार्य यांनी व्यक्त केलं आहे.
क्वारंटाईनच्या नियमात सूट दिल्याने स्थानिकांनीही आनंद व्यक्त केला आहे. हॉटेल व्यावसायिक आणि गाईड यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर तंबू आणि इतर सुविधा देण्यासाठी स्थानिकांची लगबग सुरू झाली आहे. नेपाळ सरकारने सध्या हिमालयाची चढाई करण्याऱ्या 45 गिर्यारोहकांना संमती दिली आहे. या क्वारंटाईनचे नियम शिथिल केल्यानंतर आता ही संख्या 300 च्या घरात पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तिबेटमधून एव्हरेस्ट चढाई करण्यास अजूनही मनाई आहे. त्यामुळे गिर्यारोहक नेपाळमार्गे हिमालयात गिर्यारोहण करण्याचा पर्याय निवडू शकतात.
कोरोनापूर्वी नेपाळमध्ये मोठ्या संख्येने गिर्यारोहक येत होते. त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले होते. 2019 साली क्षमतेपेक्षा जास्त गिर्यारोहक आले होते. विक्रमी 885 जणांनी एव्हरेस्टची चढाई केली होती. मात्र या गिर्यारोहकांच्या वाढत्या गर्दीमुळे 11 जणांना जीव गमवावा लागला होता. नेपाळमध्ये आतापर्यंत 2 लाख 76 हजार 665 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 2 लाख 72 हजार 342 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या नेपाळमध्ये 1 हजार 299 कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 24 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.