कराची 20 जानेवारी : पाकिस्तान सरकार (Pakistan Government) आणि लष्कराच्या आश्रयाखाली पीओके (PoK) हे दहशतवाद्यांचं (Terrorist) सुरक्षित आश्रयस्थान बनलं आहे. तर स्थानिक नागरिक मात्र पाकिस्तानी सरकारमुळे सतत त्रस्त आहेत. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलिक वसीम नावाच्या व्यक्तीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मदतीचं आवाहन केलं आहे. ट्विटरवरील या व्हिडिओमध्ये (Twitter Video) मुझफ्फराबादचा रहिवासी मलिक वसीम म्हणत आहे की नरेंद्र मोदी या आणि आम्हाला या अत्याचारातून मुक्त करा. या व्यक्तीनं सांगितलं की स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने आमचं घर सील केलं आहे आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं आहे. माझी मुलं आणि बाकीचं कुटुंब पावसात रस्त्यावर बसलं आहे.
माझ्यासोबत जर काही चुकीचं झालं तर त्याला मुझफ्फराबादचे आयुक्त आणि तहसीलदार जबाबदार असतील, असं या व्यक्तीनं म्हटलं. पोलिसांनी आमच्या घराचं कुलूप उघडावं. असं झालं नाही तर मी भारत सरकारची मदत घेण्यास भाग पडेल. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी या लोकांना धडा शिकवावा.
पाकिस्तान सरकार आणि प्रशासनाच्या या अत्याचारांपासून नरेंद्र मोदींनी आपल्याला वाचवावं, अशी मागणी मलिक वसीम यांनी केली. या भागात असलेली बहुतांश मालमत्ता ही भारताशी संबंध असलेल्या आणि शीख लोकांची आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिकांवर पाकिस्तानी लष्कर आणि सरकारकडून होणारे अत्याचार ही काही नवीन गोष्ट नाही. भारताने या मुद्द्याचा आंतरराष्ट्रीय मंचांवर वारंवार पुनरुच्चार केला आहे.
भारतीय लष्करानं असंही म्हटलं आहे की पीओकेमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि आश्रय दिला जातो आणि नंतर या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी पाठवले जाते. पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवते. मात्र, गेल्या काही वर्षांत लष्कराने घुसखोरीच्या घटनांवर कडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.