सर्व फोटो क्रेडिट - AP/PTI
सिंगापूर, 28 एप्रिल : नागेंद्रन धर्मलिंगमच्या (Nagaenthran Dharmalingam) फाशीवरून सिंगापूरमध्ये निषेध सुरू झाला आहे. नागेंद्रन हा भारतीय वंशाचा असून त्याचा जन्म मलेशियामध्ये झाला होता. 2009 मध्ये त्याला ड्रग्ज बाळगल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटकेनंतर 13 वर्षांनी बुधवारी त्याला फाशी (death sentence) देण्यात आली. नागेंद्रन मानसिकदृष्ट्या कमकुवत (Mentally weak) होता आणि त्याची आयक्यू पातळी (IQ level) केवळ 69 होती. 34 वर्षीय नागेंद्रनला नोव्हेंबर 2010 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नागेंद्रन धर्मलिंगम याचा जन्म 13 सप्टेंबर 1988 रोजी मलेशियाची राजधानी इपोह येथे झाला. त्याला दोन लहान भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्याची फाशीची शिक्षा बदलण्यासाठी त्याच्या आईने सर्व न्यायालयांमध्ये धाव घेतली. पण सिंगापूरमधील प्रत्येक कोर्टानं त्याचं अपील फेटाळलं. धर्मलिंगमकडून 42.72 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. सिंगापूरमध्ये 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉइनसह पकडलं गेल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
धर्मलिंगम कसा पकडला गेला? धर्मलिंगम 22 एप्रिल 2009 रोजी मलेशियाहून सिंगापूरला आला. तेव्हा त्याचं वय 21 वर्षे होतं. त्याच्या मांडीवर हेरॉईनचं बंडल बांधलेलं होतं. त्यातील हेरॉईनचं प्रमाण 42.72 ग्रॅम होतं. त्याला चेकपॉईंटवर पकडण्यात आलं. धर्मलिंगम यांच्यासोबत कुमारसेन या त्यांच्या आणखी एका साथीदारालाही अटक करण्यात आली होती, पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. चौकशीत धर्मलिंगमने ड्रग्ज आणल्याची कबुली दिली होती. मात्र, त्याला त्याच्या चिनी मित्राने फसवल्याचा दावाही त्याने केला आहे. त्याला ‘किंग’ म्हटलं जात असे. असं केलं नाही तर प्रेयसीला ठार मारेन, अशी धमकीही दिल्याचं धर्मलिंगमनं सांगितलं. त्याचवेळी वडिलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आणि कर्ज फेडण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. त्यासाठी त्यानं हे केल्याचं म्हटलं होतं. धर्मलिंगम अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. सिंगापूरच्या उच्च न्यायालयाने 22 नोव्हेंबर 2010 रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्याचं अपील फेटाळून लावलं, ज्यात त्याने हे सर्व करण्यासाठी दबाव आणल्याचे म्हटलं होतं. 27 जुलै 2011 रोजी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही त्याचं अपील फेटाळलं. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, पण फाशी थांबली नाही उच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर धर्मलिंगम आणि त्याच्या आईने सर्व न्यायालयांचे दरवाजे ठोठावले. धर्मलिंगम याने सिंगापूरच्या राष्ट्रपती हलिमा याकोब यांच्यासमोर दयेचा अर्ज दाखल करताना, त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचे आवाहन केलं. परंतु, तिथंही त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. सर्व अपील फेटाळल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये धर्मलिंगम याच्यावर डेथ वॉरंट (death warrant) जारी करण्यात आला होता. त्याला 26 ऑक्टोबरला फाशी देण्यात येणार असल्याचं त्याच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं होतं. नंतर हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेलं. या वर्षी 20 एप्रिलला त्याच्यासाठी दुसरा डेथ वॉरंट जारी करण्यात आला आणि 27 एप्रिलला त्याला फाशी देण्यात आली. हे वाचा - 11 कोटींचं cocain कुठे लपवलं ते पाहून कस्टम अधिकारीही चक्रावले, तस्कराला विमानतळावर अटक
अंमली पदार्थांच्या तस्कराच्या फाशीला विरोध का?
ड्रग्जबाबत जगातील सर्वात कडक कायदा सिंगापूरमध्येच आहे. येथे 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन मिळाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. याच कारणामुळे धर्मलिंगम याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण धर्मलिंगम याच्या फाशीच्या शिक्षेलाही विरोध झाला. फासावर लटकवल्यानंतरही या शिक्षेला विरोध होत आहे.
या फाशीला विरोध करण्याचे कारण म्हणजे, धर्मलिंगम हे मानसिकदृष्ट्या आजारी होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्याचा बुद्ध्यांक फक्त 69 आहे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार याला मानसिक अपंगत्व मानलं जातं. मात्र, धर्मलिंगमला आपण काय करत आहोत, हे माहीत होतं आणि त्यामुळेच त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं न्यायालयाचे म्हणणं आहे. हे वाचा - मध्यरात्रीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा सुपडा साफ, दोन AK-47 ही जप्त धर्मलिंगम याची फाशी थांबवण्यासाठी हजारो लोकांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांना फाशी देता येत नाही, असं या लोकांचं म्हणणं होतं. मात्र, सरकार व न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही. फाशी दिल्यानंतर सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, धर्मलिंगम याने त्याचे सर्व कायदेशीर अधिकार वापरले आहेत.