नवी दिल्ली 16 मार्च : हाँगकाँगस्थित साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे, मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे (Corona Cases Increased in China). सध्या चीन वुहानमधील कोरोना उद्रेकानंतरच्या सर्वात वाईट कोविड संकटाशी झुंज देत आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, देशात एकाच दिवसात 5280 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी दोन वर्षांत नोंदवण्यात आलेल्या दैनंदिन प्रकरणांतील सर्वात मोठी संख्या आहे. येथील कोविडची वाढती प्रकरणे पाहता शेन्झेन शहरात सरकारने लॉकडाऊन केलं आहे. या शहराची लोकसंख्या 17 दशलक्षाहून अधिक आहे. विषाणूचा आणखी प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इतर अधिकार्यांनी इशारा दिला आहे की, सध्याची परिस्थिती पाहता महामारी संपली आहे असं घोषित करता येणार नाही.
हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (IIT) प्राध्यापक आणि राष्ट्रीय कोविड सुपरमॉडेल समितीचे प्रमुख डॉ. एम विद्यासागर यांनी TV9 सोबत बोलताना सांगितलं की, भारतातील सध्याच्या परिस्थितीची (Coronavirus in India) चीनमधील कोविड प्रकरणांच्या वाढत्या संख्येशी तुलना करू नये. ते केसेस वेगळ्या पद्धतीने नोंदवतात. चीनच्या शून्य कोविड धोरणाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथे खूप कडक नियम आहेत. त्यामुळे शेनझेनसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात त्यांनी काही हजार केसेस नोंदवल्या तर चीन सरकार हा मुद्दा अगदी जोर देऊन मांडेल. पुढे ते म्हणाले की याआधीही त्यांनी असंच धोरण अवलंबलं आहे. कारण डेल्टा व्हेरिएंटच्या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यात ते यशस्वी झाले, परंतु उर्वरित जगामध्ये असं घडलं, असं असं मला वाटत नाही. विशेषत: भारतात आता कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची शक्यता फारच कमी आहे, असं झालं तरी त्याचा प्रभाव खूप कमी असेल.
ते म्हणाले, की हाँगकाँग आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये कोरोनावर योग्य नियंत्रण ठेवण्याऐवजी खूप दडपशाही केली जात आहे. त्यांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे प्रेशर कुकरवर झाकण ठेवून स्टोव्हची ज्योत वाढवत राहाण्यासारखं आहे. हे जास्त काळ चालू शकत नाही. ते नैसर्गिक प्रतिकारशक्तीपेक्षा लस-प्रेरित प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या देशांमध्ये कोविडची प्रकरणे वाढत आहेत. डॉ विद्यासागर म्हणाले, “मला वाटत नाही की आता फार सावध राहण्याची गरज आहे. आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे कोरोनाच्या संकटाची फेज संपली आहे. सावध राहाण्याऐवजी आपण आता लक्ष दिलं पाहिजे. आपण सामान्य जीवन पुन्हा सुरू केलं पाहिजे आणि सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे.