नवी दिल्ली, 28 मार्च : सीमाभागत चीनच्या कुरापती थांबण्याचं काही नाव घेत नाहीय. गेल्या दोन वर्षांपासून गलवान खोऱ्यावरून भारत आणि चीनमध्ये (India-china) तणाव कायम आहे. नुकतेच चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताच्या दौऱ्यावर येऊन संबंध सुधारवण्याचं नाटक केलं. पण, आतून चीन नेहमीच भारताविरुद्ध कट रचत असतो. आता चीन नेपाळमध्ये Alipay डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून भारतीय सुरक्षेचा भंग करत आहे. गुप्तचर अहवालानुसार, नेपाळमध्ये चीनच्या सर्वात मोठ्या डिजिटल वॉलेटचा प्रचार करण्यासाठी, एक चीनी कंपनी ग्राहकांना पैसे देण्याचे आमिष देत आहे. त्यामुळे तिथल्या लोकांकडून अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती गोळा केली जात आहे, पण असे करून भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. अलीपे (Alipay) हे चीनमधील सर्वात मोठे मोबाइल डिजिटल पेमेंट वॉलेट आहे. त्याच्या वापरण्याला नेपाळमध्ये दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये मान्यता देण्यात आली होती. मात्र, नेपाळच्या जनतेने यात रस दाखवला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या कंपन्यांनी नेपाळी लोकांना आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. पासपोर्ट आणि वैयक्तिक माहितीची मागणी रिपोर्टनुसार, Alipay या डिजिटल पेमेंट अॅपचे ग्राहक बनण्यासाठी कंपनीचे कर्मचारी गावोगावी भेट देत आहेत आणि त्यांना हे अॅप डाउनलोड करण्याचे आमिष दाखवत आहेत. या अॅपवर खाते उघडण्याच्या बदल्यात कंपनी 2000 नेपाळी रुपयांचे आमिष देत आहे. गुप्तचर अहवालानुसार चीनी कंपन्यांचे अधिकारी खाती उघडण्यासाठी नेपाळी लोकांची माहिती गोळा करत आहेत. यामध्ये पासपोर्ट आणि वैयक्तिक माहिती मागवली जात आहे. लोभापायी लोक या अॅपचे ग्राहक बनत आहेत. जरी अलीपे नेपाळमध्ये खूप पूर्वी सुरू झाले होते आणि ते नेपाळच्या कर प्रणालीला बायपास करत होते. नेपाळ सरकारने 2019 मध्ये त्यावर बंदी घातली होती. वृद्ध लोकसंख्या वाढल्याने चीन धोकादायक स्थितीत! पेन्शन द्यायलाही पैसे नाहीत, ड्रॅगनचं नेमकं चुकलं काय? यानंतर, चीनी कंपनी WeChat ने Alipay सोबत डिजिटल पेमेंटसाठी अधिकृत मंजुरीसाठी अर्ज केला. ज्याला नेपाळ राष्ट्र बँकेने 2020 मध्ये मान्यता दिली होती. रिपोर्टनुसार, हे डिजिटल वॉलेट हिमालयन बँक ऑफ नेपाळच्या सहकार्याने ऑपरेट केले जाऊ शकते. मात्र, त्यानंतरही त्याची लोकप्रियता नगण्य आहे. त्यामुळेच आता चिनी कंपनी नेपाळी लोकांना 2000 नेपाळी रूपयांचे आमिष दाखवून Alipay चे ग्राहक बनवत आहे. भारताला काय धोका आहे? वास्तविक, भारतीय सैन्यात गोरखा रेजिमेंट आहे. गोरखा रेजिमेंटमधील हजारो सैनिक हे नेपाळचे अधिवासित नागरिक आहेत. गोरखा रेजिमेंटमध्ये नेपाळी अधिवास असलेल्या गोरखांच्या एकूण 45 बटालियन आहेत. एका बटालियनची संख्या 600 च्या जवळपास आहे. त्यानुसार भारतीय सैन्यात नेपाळी गोरखा सैनिकांची संख्या सुमारे 27 हजार होते. याशिवाय भारतीय लष्करातून 50 ते 1 लाखांपर्यंत निवृत्त गुरखा आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही असतील. भारतासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. चीनचा ढोंगीपणा! एकीकडे भारतासोबत ‘गोड शब्द’, तिकडे उभारतायेत रस्त्यांचे जाळं या निवृत्त सैनिकांना भारत सरकार पेन्शन, वैद्यकीय आणि इतर सुविधा पुरवते. जर त्यांचे खाते नेपाळी बँकेशी जोडले गेले तर सर्व वैयक्तिक माहिती चीनला सहज मिळू शकते. ही माहिती चिनी कंपन्यांपर्यंत पोहोचली तर भारतावर धोरणात्मक दृष्टिकोनातून विपरीत परिणाम होईल. चिनी हॅकर्स नेहमीच भारत सरकारची माहिती गोळा करण्यात गुंतलेले असतात. अशा परिस्थितीत चीन डिजिटल पेमेंटद्वारे भारतीय सुरक्षेचा भंग करून भारतविरोधी कारवायांना खतपाणी घालू शकतो.