मुंबई, 18 फेब्रुवारी : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी प्रवासी यंत्रणा मानली जाते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे भारत’ हा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार देशात 10 अत्याधुनिक ‘वंदे भारत’ गाड्या सुरू केल्या असून त्या 17 राज्ये आणि 108 जिल्ह्यांना जोडत आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांतूनही या गाड्या जात आहेत. गुजरात आणि महाराष्ट्राच्या राजधानीच्या शहरांना जोडणारी वंदे भारत कॅपिटल एक्सप्रेस सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. या गाडीला प्रवाशांचा 130 टक्के प्रतिसाद असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. प्रवाशांचा सर्वाधिक 130 टक्के प्रतिसाद मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी ही गाडी सुरू झाली होती. मुंबई आणि गांधीनगरला जोडणारी ही गाडी सात जिल्ह्यांतून जाताना बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा आणि अहमदाबाद या शहरांना जोडते. या रेल्वेला इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वाधिक 130 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आता जनावरांच्या धडकेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी लवकरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर मेटल बीम फेसिंग करण्यात येणार आहे, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली.
Vande Bharat Express Train : वंदे भारत निर्मितीतही ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण देशाची भागणार गरज, Videoमहाराष्ट्रातील लातूरमध्ये बोगींची निर्मिती वंदे भारत रेल्वे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर या रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. यातील बोगींची निर्मिती भारतातच केली जात आहे. चेन्नई येथील कारखान्यात सध्या बोगींची निर्मिती केली जात आहे. लवकरच महाराष्ट्रातील लातूर येथेही या अत्याधुनिक बोगींची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि हरियाणातील सोनीपत येथेही बोगींची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतातील 10 वंदे भारत रेल्वे भारतात सध्या 10 वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. यामध्ये नवी दिल्ली - वाराणसी, नवी दिल्ली - श्री माता वैष्णो देवी कटडा, मुंबई - गांधीनगर, नवी दिल्ली - अंब अंदौरा, चेन्नई सेंट्रल - म्हैसूर, नागपूर - विलासपूर, हावडा - न्यू जलईपाईगुडी, सिकंदराबाद - विशाखापट्टणम, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - सोलापूर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई - शिर्डी या गाड्यांचा समावेश आहे.