विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 25 जून: टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नागपूर शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे. मध्य भारतातील ते एक प्रमुख प्राणी संग्रहालय असून पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथील 115 हेक्टर क्षेत्रात वेगवेगळ्या भागात मुक्त संचार करत असलेले प्राणी बघणे म्हणजे आपण एखाद्या राष्ट्रीय प्रकल्प किंवा अभयारण्यात फिरत असल्याचा भास करून देणारे असल्याने पर्यटकांची येथे कायम गर्दी बघायला मिळते आहे. जंगल सफारीसाठी उत्तम पर्याय नागपूर शहराच्या परिघात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प असल्याने नागपूर शहराची टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी एक विशेष ओळख आहे. मध्यभरातील नागपूर हे प्रमुख शहर आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्याने वर्षाकाठी लाखो पर्यटक देशातील कानाकोपऱ्यातून जंगल सफारी करण्यासाठी नागपुरात येत असतात. त्यात पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे एक उत्तम पर्याय आहे.
देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे 564 हेक्टर एवढे मोठ्या क्षेत्रावर पसरलेले असून हे संग्रहालय मध्य भारतातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय आहे. आजघडीला 115 हेक्टर क्षेत्रावर काम पूर्ण झाले आहे. तर 450 हेक्टर क्षेत्रावरील काम प्रगती पथावर असून आगामी 3-4 वर्षात ते पूर्णत्वास येऊन देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय ठरणार आहे. येथे 4 सफारी आहे. ज्यामध्ये बिबट्या, वाघ, अस्वल, आणि निरनिराळे हरीण, काळवीट, नीलगाय, मोर आदी सारखे प्राणी आहेत. वन्यप्राणी करतात मुक्त संचार प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी पिंजऱ्यात बंद असतात. पण गोरेवाडा संग्रहालयात मुक्त संचार करणारे प्राणी पाहता येतात. या संग्रहालयातील 115 हेक्टर क्षेत्रात वेगवेगळ्या भागात मुक्त संचार करणारे वन्यजीव सोडले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रात मुक्त वावर करतांना बघून पर्यटकांना आपण एखाद्या राष्ट्रीय प्रकल्प किंवा अभयारण्यात फिरत असल्याचा भास होतो, अशी माहिती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली. छेड काढणं पडलं महागात, संतापलेल्या हत्तीणीनं तरुणांना घडवली अद्दल, गडचिरोलीमधील धक्कादायक Video देशभरातील दुर्मिळ हरणांची सफर गोरेवाडा पार्कमध्ये मणिपूरचे राज्य प्राणी असलेले संगाई हरीण आहे. सध्या हे हरीण दूर्मिळ असून देशात केवळ 280 शिल्लक आहेत. तसेच अतिशय दुर्मिळ समजले जाणारे ‘अल्बिनोस’ हे पांढरे हरीण या ठिकाणी आहे. त्यांना पिल्ले देखील झाली आहेत. तसेच ज्याला आपन ‘बार्किंग डियर’ किंवा ‘भुंकणारे हरीण’ म्हणतो हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान हरीण आहे. चितळ, सांबर, नीलगाय मोर असे इतर प्राणी देखील आहेत. शिवाय 2 वाघ आहेत. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणारे हे प्राणी संग्रहालय आहे, असे भागवत यांनी सांगितले. ऑनलाइन / ऑफलाईन देखील करा बुकिंग उन्हाळ्यात प्राणी संग्रहालय सकाळी 8 ला सुरू होते. तर संध्याकाळी 6 ला शेवटची बस असते. तर हिवाळ्यात हीच सफारी सकाळी 8.30 ला सुरू होऊन संध्याकाळी 4 ला बंद होते. सफारी ही एक तासाची असून आठवड्यातून सोमवार वगळता सर्व दिवस हे संग्रहालय खुले असते. तिकीट दर हे मंगळावर ते शुक्रवार एसी बस शुल्क 300 तर नॉन एसी बस 200 रुपये आहे. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी हेच दर 100 रुपयांनी वाढून एसी बस शुल्क 400 तर नॉन एसी बस 300 रुपये आहे. बाहेगावातून येणाऱ्या पर्यटकांनी पूर्व बुकिंग केल्यास ते अधिक सोयीचे होईल. त्यासाठी आमची वेबसाईट आहे. www.wildgorewada.com येथे भेट देऊन आपण आपली पूर्व बुकिंग करू शकता. पर्यटकांनी वेळेच्या 15 मिनिटे आधी यावे, जेणेकरून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होईल अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली.