नवी दिल्ली, 10 जून : माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT Ministry) जारी केलेल्या इंटरमीडियरी गाइडलाइन्सनंतर मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter), ट्विटर नव्या गाइडलाइन्सचं पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, आश्वासन भारत सरकारला दिलं दिलं आहे. IT Ministry नुसार, मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या मूळ कंपनी किंवा इतर सहाय्यक कंपनीद्वारे भारतात सेवा देतात. यातील काही आयटी कायद्यानुसार आणि नव्या नियमाअंतर्गत महत्त्वाच्या सोशल मीडिया इंटरमीडियर्सच्या (SSMI) कक्षेत येतात. अशात नियमांचं पालन करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतातील त्यांचा प्रत्यक्ष पत्ता, अॅपचं नाव, वेबसाईट आणि सर्विसेस सारख्या डिटेल्सशिवाय तीन प्रमुख कर्मचाऱ्यांचा तपशील द्यावा लागेल. भारतातील या नियमांचं पालन न केल्यास, सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
नव्या नियमानुसार, प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणं आवश्यक आहे. तसंच या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात व्हावी आणि ते इथेच राहावेत असं देखील सांगण्यात आलं आहे.
नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट आणि अॅपवर द्यावी लागेल. तसंच तक्रार करण्याची पद्धतही सांगावी लागेल, जेणेकरुन युजर्स, पीडित व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकेल. तक्रार अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत तक्रार नोंदवल्याबाबतची माहिती द्यावी लागेल. तसंच तक्रार दाखल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्या तक्रारी निकाली काढाव्या लागतील.