एलॉन मस्क
मुंबई, 11 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि या कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा झाल्यापासून त्यांनी धक्कादायक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मस्क यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन जगभरातल्या युझर्सना मोठा धक्का दिला आहे. मस्क यांनी 150 कोटी अकाउंट्स डिलीट करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. ट्विटर लवकरच 150 कोटी निष्क्रिय अकाउंट्स बंद करणार आहे, असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या ट्विटर युझर्सनी गेल्या काही वर्षांत एकही ट्विट केलेलं नाही, अशा युझर्सची अकाउंट्स आता डिलीट केली जाणार आहेत. या निर्णयामुळे ट्विटर युझर्समध्ये एकच खळबळ उडाली असून, एलॉन मस्क पुन्हा चर्चेत आले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांच्या धक्कादायक निर्णयांची मालिका अजून संपलेली नाही. ज्या युझर्सनी गेल्या काही वर्षांत एकही ट्विट केलेलं नाही, अशा युझर्सची अकाउंट्स डिलीट करण्याचा निर्णय मस्क यांनी नुकताच जाहीर केला आहे. या कारणास्तव ट्विटर 150 कोटी अकाउंट्स बंद करणार आहे. याबाबतची माहिती एलॉन मस्क यांनी ट्विटरवरून दिली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, `ट्विटर लवकरच 150 कोटी अकाउंट्स हटवण्यास सुरुवात करील. यामुळे प्लॅटफॉर्मवर अनेक ट्विटर हॅंडल्स आणि युझरनेम्स वापरासाठी उपलब्ध होतील. निष्क्रीय अकाउंट्स डिलीट करणं साहजिकच आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या युझर्सकडून एकही ट्विट करण्यात आलेलं नाही.` हेही वाचा - खुशखबर! Twitter वर आले नवीन फीचर, तुम्ही ‘लाइव्ह ट्विटिंग’ करून पाहिलंय का? कसे वापरायचे? याशिवाय आता ट्विटवरदेखील व्ह्यूज पाहता येणार असल्याचं ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे युझर्सना त्यांचं ट्विट किती जणांनी पाहिलं आहे, हे समजू शकणार आहे. आपण व्हिडिओवर ज्याप्रमाणे व्ह्यूज बघतो, त्याप्रमाणे ही सुविधा असेल. `अनेकांना वाटतं, त्यापेक्षा ट्विटर अधिक जिवंत आहे,` असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. 15 वर्षांपासून निष्क्रिय असलेली अकाउंट्स हटवली जातील, असं एलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. तथापि, जी अकाउंट्स एक वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत, त्यांनादेखील धोका असू शकतो, असे संकेत मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये दिले होते. मस्क यांनी पदभार स्वीकारताच ट्विटरच्या दैनंदिन सक्रिय युझर्सची संख्या वाढली आहे, असं काही अहवालांमधून स्पष्ट झालं आहे. निष्क्रिय युझर्सकडे जे ट्विटर हँडल आणि युझरनेम आहे, ते इतर युझर्सना हवं आहे, अशी तक्रार काही युझर्सनी केली आहे. ट्विटरच्या सुरुवातीच्या काळात अशी खास हँडल्स आणि युझरनेम्स ताब्यात घेण्यात आली होती. ट्विटरने 13.7 कोटी युझर्सचा समावेश मोनेटायझेबल डेली अॅक्टिव्ह युझर्सच्या वर्गवारीत केला आहे. हे युझर्स ट्विटर प्लॅटफॉर्मवर नियमित अॅक्टिव्ह असतात आणि त्यांना जाहिरातीदेखील दिसतात. त्यामुळे आता अकाउंट डिलीट करण्यासाठी ट्विटर नेमके कोणते निकष लावतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.