गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्याच्या या विक्रमाची दखल घेतली आहे.
मुंबई, 31 जानेवारी: दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडथळे येतात. विज्ञानाच्या मदतीनं त्यांच्या मदतीसाठी काही साधनं विकसित करण्यात येतात. हा एवढासा आधारदेखील दिव्यागांना अनेक मोठे पराक्रम करण्यासाठी पुरेसा ठरतो. अगदी जागतिक विक्रम (World Record) नोंदवण्याची किमयाही ते सहज करू शकतात. ओडिशामधील (Odisha) कमलकांत नायक (Kamala Kanta Nayak) या पक्षाघातग्रस्त 28 वर्षीय तरुणानं हे सिद्ध करून दाखवलं असून, त्यानं व्हीलचेअरवरून (Wheelchair) जास्तीत जास्त अंतर कापण्याचा नवीन जागतिक विक्रम नोंदवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्याच्या या विक्रमाची दखल घेतली आहे. पुरी (Puri) इथल्या कमलकांत नायक यानं मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT Madras) तयार केलेल्या व्हीलचेअरवरून 24 तासांत 215 किलोमीटरचे अंतर पार केलं आणि गिनीज बूकमध्ये त्याचं नाव नोंदवलं. या पूर्वी, 2007 मध्ये पोर्तुगालच्या मारियो त्रिनिदादने पोर्तुगालमधील विला रियल स्टेडियमवर 24 तासांत 182 किलोमीटर अंतर कापून विक्रम केला होता. Xiaomi इंडिया युजर्ससाठी खास बातमी, कंपनी लॉन्च करणार खास APP आयआयटी मद्रासच्या टीटीके (TTK) सेंटर फॉर रिहॅबिलिटेशन रिसर्च अँड डिव्हाईस डेव्हलपमेंटने (R2D2) निओमोशन (Neomotion) या स्टार्ट-अपच्या माध्यमातून गेल्या वर्षी दिव्यांगांसाठी मोटार असलेली निओबोल्ट(NeoBolt) नावाची खास व्हीलचेअर विकसित केली. वेगवेगळ्या दिव्यांग लोकांना स्वतःच्या बळावर प्रवास करता यावा, या उद्देशानं ही व्हीलचेअर तयार करण्यात आली आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती वेगळी असू शकते त्यामुळे त्यांच्या वेगवेगेळ्या कमतरतेचा विचार करून ही व्हीलचेअर तयार करण्यात आली असून, ती 18 वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाऊ शकते. यामध्ये मोटार असलेले एक मशीन असून, ते हवे तेव्हा व्हीलचेअरला लावता येते आणि काढता येते. या मोटारीमुळे या निओबोल्टचे (Neobolt) रुपांतर ‘निओफ्लाय’ (Neofly) या सुरक्षित वाहनामध्ये होते. हे वाहन कच्च्या रस्त्यावरून किंवा तीव्र उतारावर किंवा तीव्र चढावर देखील चालू शकते. खडबडीत रस्त्यांवर धक्के बसू नयेत यासाठी यात उत्तम प्रकारचे सस्पेन्शन देण्यात आलं आहे. लिथियम-आयन बॅटरीवर चालणारी ही व्हीलचेअर कमाल 25 किमी प्रति तास वेगाने जाऊ शकते आणि प्रति चार्ज 30 किमी अंतर कव्हर करू शकते. ही खास व्हीलचेअर 95,000 रुपयांना उपलब्ध असून, ऑर्डर दिल्यानंतर चार महिन्यांच्या आत ती तयार करून दिली जाईल, अशी माहिती आयआयटी मद्रासनं दिली आहे. याबाबत बोलताना ‘R2D2’च्या प्रमुख, सुजाता श्रीनिवासन म्हणाल्या की, ‘या व्हीलचेअरची रचना ही नायक यांची शारीरीक स्थिती लक्षात घेऊन त्यांना आरामदायी ठरेल, अशा पद्धतीनं करण्यात आली होती. गुरुत्वाकर्षणाच्या केंद्रापासून ते चाकांच्या योग्य आकाराच्या निवडीपर्यंत सर्व बाबी अगदी काटेकोरपणे तपासण्यात आल्या होत्या. नायक यांना या निओफ्लाय व्हीलचेअरच्या वापराचं चार वर्षांहून अधिक काळ प्रशिक्षण देण्यात आलं होतं. विश्वविक्रम करण्यात कसलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने कसून प्रयत्न करण्यात आले होते.’ मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच आयआयटी मद्रासनं घडवलेल्या या अनोख्या व्हीलचेअरमुळे अनेक दिव्यांगांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची संधी मिळणार असून, त्यांना त्यांचं आयुष्य अधिक स्वावलंबीपणे जगणं शक्य होणार आहे. याची किंमतही किफायतशीर आहे, त्यामुळे अनेक दिव्यागांचे जीवन सुकर होणार आहे.