नवी दिल्ली, 2 मे : Mahindra and Mahindra देशातील मोठी कार निर्माता कंपनी आहे. कंपनीने देशात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, सरकार आणि लोकांच्या मदतीसाठी नवीन योजना आणली आहे. ज्यात कंपनी आपल्या बोलेरो पिकअप ट्रकद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करेल. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितलं, की कंपनी आपल्या 70 बोलेरो ट्रकद्वारे ऑक्सिजन सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवला जाईल. ही सुविधा मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये पुढील 24 तासांत सुरू केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात ही स्थिती अधिकच गंभीर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 46 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 68 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशात महिंद्रा अँड महिंद्राने ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’ची सुरुवात महाराष्ट्रातून केली आहे. इतर राज्यात लवकरच सुरू होणार ही सुविधा - आनंद महिंद्रा यांनी सांगितलं, की सध्या ही सुविधा महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. परंतु लवकरच ही सुविधा इतर राज्यातही सुरू केली जाईल. या योजनेत लोकल डीलरची मदत घेतली जाईल, तसंच लोकल प्रशासनाचीही मदत घेतली जाण्याचं सांगण्यात आलं आहे.
कसं काम करेल ऑक्सिजन ऑन व्हिल्स - ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम सुरळितपणे चालवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी गोदामही तयार केलं आहे, जेथे जवळच्या ऑक्सिजन प्लाँटमधून रिकामा ऑक्सिजन सिलेंडर पुन्हा वापरण्यासाठी रिफिल केला जाईल.