नवी दिल्ली, 27 जून: दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांची जवळपास 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करुन गेलेल्या पाच लाख रुपयांपैकी जवळपास सव्वा तीन लाख रुपये डॉक्टरांना परत मिळाले आहेत. हे नेमकं कसं आणि का झालं याबाबत पोलीस उपायुक्त, सायबर क्राईमने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. फ्रॉड करणाऱ्यांनी डॉक्टरांना मोबाईल सिम बंद होण्याचा बहाणा देत त्यांच्याकडून ओटीपी मागितला आणि त्यानंतर खात्यातून पैसे गायब झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एम्सचे डॉक्टर चेतन यांची 4 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सव्वा तीन लाख रुपये डॉक्टरांना परत मिळाले आहेत. डॉक्टर चेतन यांना एक फोन कॉल आला होता. कॉल करणाऱ्यांनी त्यांना सिम कार्ड ब्लॉक होईल असं सांगितलं. डॉक्टर चेतन यांनाही हे खरं असल्याचं वाटलं. कॉल करणाऱ्यांनी सिम बंद होऊ नये यासाठी त्यांच्या फोनवर आलेला ओटीपी देण्यास सांगितलं. डॉक्टर चेतन यांनांही हे खरं असल्याचं वाटलं आणि त्यांनी ओटीपी सांगितला. ओटीपी सांगताच चेतन यांच्या खात्यातून 4 लाख 90 हजारांची रक्कम कट झाली.
डीसीपी सायबर क्राईम अन्येश रॉय यांनी सांगितलं, की फसवणूक झाल्यानंतर सव्वा तीन लाख रुपये परत आले कारण या घटनेची माहिती 155260 वर लवकरात लवकर देण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेलं पोर्टल, अॅप आणि बँकेला अलर्ट पाठवण्यात आला आणि रक्कम फ्रॉडस्टर्सच्या खात्यात पोहचण्याआधीच रोखली गेली. अशा कोणत्याही फसवणुकीची सूचना सायबर सेलच्या हेल्पलाईन 155260 वर दिल्यास नाव, घटनेची वेळ, खाते क्रमांकाची माहिती द्यावी लागेल. भारत सरकारने इंटरनेट बँकिंगसह ऑनलाईन फायनान्सशी संबंधित फसवणुकीची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर 155260 जारी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर फसवणूक होऊन 24 तासांहून अधिक वेळ झाल्यास, पीडित व्यक्तीला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर एक तक्रार दाखल करावी लागेल. जर फ्रॉड होऊन 24 तासांहून कमी वेळ झाला असल्यास ऑपरेटर फॉर्म भरण्यासाठी फसवणुकीचे डिटेल्स आणि पीडित व्यक्तीची माहिती द्यावी लागेल.