नवी दिल्ली, 14 मार्च : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे. अशात सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडीही देते आहे. नवीन वाहन खरेदी करणारे लोक आपल्या गरजेनुसार, इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करत आहेत. अशात एका शेतकऱ्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, जी सिंगल चार्जमध्ये 300 किमीपर्यंत चालते. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील शेतकरी सुशील अग्रवाल यांनी हा इलेक्ट्रिक कारचा कारनामा केला आहे. सुशील यांनी ही कार बनवण्याची सुरुवात लॉकडाउन काळात केली होती. सुशील अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तयार केलेली इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 300 km ची रेंज देते. त्यांनी या कारमध्ये 850 W ची मोटर लावली आहे आणि ही कार चालण्यासाठी 100Ah/54 volts ची बॅटरी वापरली आहे. या कारची बॅटरी सौर उर्जेवर चार्ज होते. ही बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. ही कार उशिरा चार्ज होत असली, तरी याची बॅटरी लाईफ 10 वर्ष आहे. त्यामुळेच ही कार, इतर कार्सच्या तुलनेत उत्तम असल्याचं सुशील त्यांनी सांगितलं.
लॉकडाउनमध्ये सुरुवात - सुशील अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी लॉकडाउनमध्ये ही कार बनवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ही कार बनवण्यासाठी दोन मॅकेनिक आणि त्यांच्या एका मित्राची मदत घेतली होती. या तिघांच्या मदतीने त्यांनी मोटर वाइंडिग, इलेक्ट्रिक फिटिंग आणि चेसिस वर्क केलं होतं.
लॉकडाउननंतर, अनलॉक प्रक्रियेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील याचा अंदाज होता असंही ते म्हणाले. त्यामुळेच त्यांनी इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीची सुरुवात केली. ही कार बनवताना त्यांनी काही पुस्तकं आणि YouTube चीही मदत घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं.