नवी दिल्ली, 16 डिसेंबर : Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅन रिचार्ज करण्यासाठी एक नवी सुविधा सुरू होणार आहे. आता जिओ ग्राहक घरबसल्या WhatsApp आणि Meta द्वारे आपला प्रीपेड प्लॅन रिचार्ज करू शकतात. Jio Platforms Ltd चे डायरेक्टर आकाश अंबानी यांनी Jio आणि Meta ग्राहकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याच्या दिशेने मिळून हे काम करत असल्याचं सांगितलं. आकाश अंबानी यांनी मेटाच्या फ्यूल फॉर इंडिया 2021 इव्हेंटमध्ये सांगितलं, की Jio प्रीपेड रिचार्ज WhatsApp द्वारे अधिक सोपं करत असून ही सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे, यामुळे ग्राहकांना आधी कधीही न मिळालेली सुविधा मिळणार आहे. WhatsApp द्वारे रिचार्ज सुविधेचं फीचर 2022 मध्ये लाँच केलं जाणार आहे. Jio प्लॅटफॉर्म्सचे संचालक इशा अंबानी यांनी सांगितलं, की हे फीचर विशेषकरुन अधिक वयोगटातील लोकांसाठी फायद्याचं ठरणार असून यामुळे रिचार्ज करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, ज्यांना कधी रिचार्ज करण्यासाठी बाहेर जाणं शक्य होत नाही. एंड-टू-एंड एक्सपिरियन्ससह WhatsApp द्वारे रिचार्जसाठी पेमेंट करण्याची क्षमता लाखो Jio ग्राहकांचं जीवन अधिक सोयीस्कर करेल, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस Reliance Jio चे 429.5 मिलियन युजर्स होते. एप्रिल 2020 मध्ये Meta ने Jio प्लॅटफॉर्मवर जवळपास 43,574 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
1 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - Reliance Jio ने सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन केवळ 1 रुपयांत मिळतो आहे. जिओने हा प्लॅन कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी लाँच केला आहे. जिओच्या 1 रुपयाच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा देण्यात आलेली नाही.