नवी दिल्ली, 1 जुलै: जर तुम्ही लिंक्डइनचा (LinkedIn) वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लिंक्डइनच्या 700 मिलियनहून अधिक युजर्सचा डेटा लीक झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, एका हॅकरने लिंक्डइन डेटाची चोरी केली आहे. यामुळे जवळपास 92 टक्के LinkedIn युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. सध्या नेटवर्किंग साईट LinkedIn चे 756 मिलियन युजर्स आहेत. या डेटामध्ये LinkedIn युजर्सचा पर्सनल डेटा आहे. ज्यात त्यांचे फोन नंबर, फिजिकल अॅड्रेस, लोकेशन डेटा, सॅलरी, बॅकग्राउंड, लिंग, सोशल मीडिया अकाउंट्स, प्रोफेशन, युजरनेम अशी अनेक माहिती आहे. RestorePrivacy - हॅकरने 22 जून रोजी एक मिलियन युजर्सचा डेटा हॅकर फोरममध्ये सँपल म्हणून टाकला. Restore Privacy ने या डेटा लीकबाबत सर्वात आधी माहिती दिली. हॅकरने एका पब्लिकेशनला, डेटा LinkedIn च्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमधून काढण्यात आल्याचं सांगितलं आहे. LinkedIn ने याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. LinkedIn ने कोणताही डेटा लीक झालेला नसल्याचं म्हटलं आहे. हा डेटा नेटवर्क स्क्रॅप करुन काढण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी तपास सुरू असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.
LinkedIn ने सुरुवातीच्या तपासानंतर कोणत्याही LinkedIn युजरचा खासगी डेटा लीक झाला नसल्याचं म्हटलं आहे. डेटा स्क्रॅप करणं LinkedIn च्या प्रायव्हसी पॉलिसीचं उल्लंघन आहे. आमच्या युजर्सची गोपनीयता सुरक्षित राहिल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. दरम्यान एप्रिलमध्येही LinkedIn डेटा लीक प्रकरण समोर आलं होतं, ज्यात 500 मिलियन अकाउंट्स प्रभावित झाल्याची माहिती होती.