नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e mohammad) या दहशतवादी संघटनेशी जोडलेले एक मोबाइल App Google Play Store वर आहे. ‘अच्छी बाते’ (Acchi batein) असं या App चं नाव आहे, पण याचा हेतू मात्र दहशतवादी आहे. हे App Google Play Store वर Educational App कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्लामिक शिक्षण दिलं जात असल्याचा दावा यातून केला जात आहे, परंतु याद्वारे निष्पाप तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. अच्छी बाते App थेट जैश-ए-मोहम्मदशी जोडलेलं नाही, तर याचं कनेक्शन जैश मौलाना मसूद अजहरशी जोडलेलं आहेत. या App मध्ये एक्सटर्नल वेब पेज लिंक आहे, जिथे मसूद अजहर आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित पुस्तकं, साहित्य आणि ऑडिओ मेसेज आहेत. याद्वारे तरुणांना दहशतवादाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे मोबाइल App 4 डिसेंबर 2020 रोजी अँड्रॉईड युजर्ससाठी लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत 5000 वेळा हे App डाउनलोड करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील अनेक इस्लामिक धर्मगुरुंचे कोट, मेसेज, पुस्तकं या App वर आहेत. App डेव्हलपर्सने एक ब्लॉग पेजही बनवलं आहे, जे App च्या डिस्क्रिप्शन पेजशी हायपरलिंक आहे. या पेजला दोन एक्सटर्नल लिंकही दिल्या आहेत. त्या लिंकमध्ये मसूद अजहरचे ऑडिओ मेसेज आहेत, जे 2001 ते 2019 पर्यंत रेकॉर्ड झाले होते.
इंडिया टुडे इन्फोर्मेशन सिक्योरिटी लॅब Innefu Labs ने ज्यावेळी या App चं टेक्निकल एनालिसिस केलं, त्यावेळी याचा सर्वर जर्मनीमध्ये असल्याचं आढळलं. हे App अनेक परमिशनही मागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसचं हे App भारतात बॅन केल्या गेलेल्या UC ब्राउजरप्रमाणे काम करतं. म्हणजे App एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर ते नेटवर्क आणि GPS लोकेशनला अॅक्सेस करतं. ज्यावेळी युजर आपला फोन सुरू करतो, त्यावेळी हे App देखील आपोआप सुरू होतं आणि बॅकग्राउंडमध्ये सतत चालू राहतं. याद्वारे फोनचं लोकेशन, नेटवर्क, स्टोरेज, मीडिया आणि इतर फाइलही अॅक्सेस केले जातात.