नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक अॅपलच्या नव्या आयफोनच्या प्रतिक्षेत असतात. नवा iPhone 13 मागील अनेक काळापासून चर्चेत होता. आता लीक रिपोर्ट्सनुसार, iPhone 13 सीरिजची लाँच डेट समोर आली आहे. iPhone 13 सीरिजचं 14 सप्टेंबर 2021 रोजी लाँचिंग होणार असल्याची माहिती आहे. 14 सप्टेंबर रोजी अॅपलच्या इव्हेंटमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini सारखे स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. 14 सप्टेंबर लाँचिंगनंतर 17 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार असून, 24 सप्टेंबरपासून सर्व फोनची विक्री सुरू केली जाईल, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 13 सीरिजमध्ये फोनच्या कॅमेरासह अनेक फीचर्स मिळणार आहेत. Mac Rumors रिपोर्टनुसार, iPhone 13 Pro मध्ये आधीच्या तुलनेत अधिक चांगली अल्ट्रा वाइड लेन्स मिळेल. लेन्सच्या 5 एलिमेंटला 6 सह अपग्रेड केलं जाईल, त्यासह ऑटोफोकस सपोर्टही असेल.
iPhone 13 सीरिज Apple A15 चिपसेटसह लाँच केला जाईल. A14 चं हे अपग्रेडेड वर्जन असेल. त्याशिवाय या मॉडेलमध्ये नवा फेस आयडी हार्डवेअर दिला जाईल, ज्याच्या मदतीने फेस मास्क किंवा चष्मा असूनही फोन अनलॉक केला जाऊ शकतो.
नव्या सीरिजच्या आयफोनमध्ये फ्रंट कॅमेराच्या जागी काही बदल केले जाऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांना नव्या फेस आयडीच्या टेस्टिंगसाठी एक स्पेशल केस दिली आहे. फेस आयडीशिवाय अॅपल नव्या डिस्प्ले टचआयडी फिंगरप्रिंटवरही काम करत असल्याची माहिती आहे.