भारतातली पहिली फ्लेक्स-फ्युएल कार 28 सप्टेंबरला होणार लाँच, काय होईल फायदा? वाचा सविस्तर
मुंबई, 15 सप्टेंबर: जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता जगभर दिसू लागले आहेत. प्रचंड पाऊस, मोठे पूर, वणवे या सगळ्यांमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होऊन गेलंय. तापमानवाढीचा सामना करण्यासाठी जगभर विविध पावलं उचलली जात आहेत, ज्यात कार्बन उत्सर्जन कमी करणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. टोयोटा ही कार उत्पादक कंपनी 28 सप्टेंबर 22 ला एक नवी कार भारतीय बाजारात लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही भारतातील पहिली फ्लेक्स-फ्युएलवर चालणारी कार असेल. ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स उत्पादक संघटनेच्या (ACMA) दुसऱ्या वार्षिक परिषदेत गडकरी बोलत होते. टोयोटा कंपनी कोणतं मॉडेल लाँच करणार आहे याबद्दल गडकरींनी माहिती दिली नाही. पण त्यांनी असं म्हटलं की ते नवी दिल्लीत फ्लेक्स-फ्युएल कारचं उदघाटन करणार आहेत. फ्लेक्झिबल फ्युएल याचं संक्षिप्त स्वरूप फ्लेक्स-फ्युएल हे आहे. हे इंधन पेट्रोलला पर्यायी म्हणून वापरता येऊ शकतं. सध्या अनेक वाहनं या इंधनावर चालतात. यात पेट्रोल आणि इथेनॉल किंवा मिथेनॉल यांचं मिश्रण असतं. इथेनॉल आणि मिथेनॉल दोन्हीही पेट्रोलच्या तुलनेत अधिक जळून कमी प्रमाणात प्रदूषण निर्माण करतं त्यामुळे त्यांचा वापर पर्यावरणपूरक आहे. शेतीतून तयार होतं फ्लेक्स-फ्युएल- ऊस आणि मक्यासारख्या पिकांपासून इथेनॉल तयार केलं जातं. त्यामुळे परदेशातून पेट्रोल आयात करण्यापेक्षा पेट्रोलसोबत इथेनॉल वापरण्याचा पर्याय फायदेशीर वाटतो. ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्स या देशांत आधीपासून फ्लेक्स-फ्युएल आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिन असलेली वाहनं वापरत आहेत. **हेही वाचा-** CNG Kit for Scooter: तुमची स्कूटर देईल 130 किमीचं मायलेज, फक्त करा हे काम कसं काम करतं फ्लेक्स-फ्युएल इंजिन?- इतर इंजिनं फक्त एकाच इंधनावर चालू शकतात पण फ्लेक्स-फ्युएल इंजिन पेट्रोल तसंच पेट्रोलमध्ये 83 टक्क्यांपर्यंत इथेनॉलमिश्रित इंधनावरही चालू शकतं. तसंच नेहमीच्या इंजिनात बदल करून ते फ्लेक्स-फ्युएलवर चालू शकेल असं करता येतं. फ्लेक्स-फ्यूलचे फायदे कोणते?- पेट्रोल-डिझेलची आयात कमी करण्यासाठी भारतात आता फ्लेक्स-फ्युएलचा वापर वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारताचं कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी मदत होण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणं हा या फ्लेक्स-फ्युएलचा महत्त्वाचा फायदा आहे. भारतातील शेती उत्पादनांपासून इथेनॉलची निर्मिती केली जाणार असल्याने स्थानिक व्यापाराला मदत होते. पेट्रोल, डिझेल या जीवाश्म इंधनांची आयात कमी झाल्याने भारताचं परकीय चलन वाचेल त्याचाही अर्थव्यवस्थेला फायदा होईल. पर्यावरण रक्षणही होईल. फेक्स-फ्युएल वापरण्याचे इतके फायदे असल्याने त्याचा वापर वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.