नवी दिल्ली, 23 जून: हीरो मोटोकार्प बाईक (Hero MotoCorp) आणि स्कूटर खरेदी करण्यासाठी आता अधिक खर्च करावा लागणार आहे. कंपनीने 1 जुलैपासून आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत 3000 रुपयांपर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इनपुट खर्चात वाढ आणि वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हीरो बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यातच बुक करणं फायद्याचं ठरेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बाईक आणि स्कूटरच्या वेगवेगळ्या मॉडेलवर किमतीची वाढ वेगवेगळी होईल. अधिकाधिक 3000 रुपयांची वाढ होईल. काही काळ वस्तूंच्या किंमती सतत वाढत होत्या, त्यामुळे इनपुट खर्चही वाढत आहे. आता यातला काही भाग कंपनीने ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर किमती वाढवण्यात आल्या आहेत.
याआधी हिरो मोटोकार्पने एप्रिलमध्येही बाईक आणि स्कूटरच्या किमतीत 2500 रुपयांपर्यंत वाढ केली होती. सध्या कंपन्या रॉ मटेरियलच्या वाढत्या किमतीचा हवाला देत दर वाढवत आहेत. मागील एका वर्षात स्टिलच्या किमती जवळपास 50 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
केंद्र सरकारने मागील एप्रिलमध्ये सर्व गाड्यांमध्ये BS6 इंजिन अनिवार्य केलं आहे. या इंजिनची किमत BS4 च्या तुलनेत अधिक असते. टू-व्हीलर्सच्या किमती वाढण्यामागे हेदेखील एक मोठं कारण आहे.