नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : सध्या देशात इलेक्ट्रिक व्हिकलची (Electric Vehicle) मागणी वाढती आहे. परंतु अनेक जण चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने किंवा तितकीशी उपलब्धता असल्याने इलेक्ट्रिक वाहन घेताना अधिक विचार करतात. परंतु आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. डोर स्टेप इंधन डिलीव्हरी करणारी कंपनी GoFuel ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोबाईल चार्जिंग स्टेशन (Mobile Charging Station) लाँच करण्याची घोषणा केली आहे. याच्या मदतीने चार्जिंग स्टेशन न जाताच कुठेही आपलं इलेक्ट्रिक वाहन चार्ज करता येणार आहे. मोबाईल स्टेशन - पुढील वर्षापर्यंत देशभरात 100 चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन लावण्यासाठी कंपनीने मेगा प्लॅन तयार केला आहे. या मोबाईल स्टेशनवर लोकांना 24 तास चार्जिंग सुविधा मिळेल. इलेक्ट्रिक व्हिकल डोमेनमध्ये पाउल ठेवण्यासाठी GoFuel ने युरोपच्या एका व्हिकल चार्जिंग कंपनीशी करार केला आहे.
ही कंपनी आपल्या चार्जिंग स्टेशनमध्ये 100 टक्के सौर उर्जा निर्मित विज उपलब्ध करेल, ज्यामुळे विज तयार करण्यास हानिकारक गोष्टींचं 0 टक्के उत्सर्जन होईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबाबत लोकांमध्ये गोंधळ आहे. GoFuel अशी पहिली कंपनी असेल, जी कधीही आणि कोणत्याही वेळी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी तयार असेल. यामुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगबाबतची समस्या सुटण्यास मदत होईल. यामुळे अधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहित होतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.