फोन
नवी मुंबई, 10 डिसेंबर : स्मार्टफोन ही अत्यंत गरजेची वस्तू बनली आहे. अनेक बाबी ऑनलाइन झाल्याने साहजिकच स्मार्टफोन युझर्सची संख्या वाढली आहे. स्मार्टफोनचा वापर संवादासोबतच अनेक गोष्टींसाठी केला जातो. बऱ्याचदा स्मार्टफोनवरून एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू असताना तुम्हाला काही विचित्र आवाज ऐकायला मिळतात. नेटवर्क किंवा अन्य काही समस्यांमुळे असे आवाज येत असतील, असं म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता; मात्र हा आवाज कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित असू शकतो. तुमचं संभाषण समोरची व्यक्ती स्मार्टफोनवर रेकॉर्ड करत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत वापरता येते. ही पद्धत नेमकी कोणती, ती कशी वापरता येते, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदा मानलं जातं. त्यामुळे गुगलने कॉल रेकॉर्डिंगसाठी वापरली जाणारे थर्ड पार्टी अॅप्स काही दिवसांपूर्वी बंद केली आहेत. याचाच अर्थ कोणालाही आता अशा अॅप्सच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाही. यासाठी युझर्सना स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट असलेलं कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरावं लागेल. तथापि, इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर सुरू केल्याचं स्मार्टफोनवर बोलत असलेल्या समोरच्या व्यक्तीला सहजपणे समजू शकतं. बऱ्याचदा आपला कॉल समोरची व्यक्ती रेकॉर्ड करत असते आणि आपल्याला त्याबद्दल काही माहिती नसतं. आपला कॉल रेकॉर्ड होतोय का नाही हे अत्यंत सोप्या पद्धतीनं जाणून घेता येऊ शकतं. नव्या स्मार्टफोनमध्ये तर यासंबंधी अनाउन्समेंटही होते; मात्र जुन्या किंवा फीचर फोनच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग होत असेल तर यासंबंधीची माहिती समजणं अवघड आहे. यासाठी तुम्ही काही पद्धतींचा वापर करू शकता. हेही वाचा - हिवाळ्यात कार चालवताना ‘ही’ चूक कधीही करू नका, अन्यथा… कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंग हे एकच आहे असं अनेकांना वाटतं; पण कॉल टॅपिंग हा वेगळा प्रकार आहे. कॉल टॅपिंगसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. कॉल टॅपिंगमध्ये तिऱ्हाइत व्यक्ती दोन व्यक्तींमधलं संभाषण रेकॉर्ड करत असते. यासाठी टेलिकॉम कंपन्यांची मदत घेतली जाते. उदाहरणार्थ, तपास यंत्रणा न्यायालयाच्या परवानगीनंतर कॉल टॅपिंग करू शकतात. कॉल टॅपिंगसाठी खासगी सुरक्षा यंत्रणा वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात. कॉल टॅपिंगविषयी कॉलर्सला थेट माहिती मिळत नाही; मात्र काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास हा प्रकार लक्षात येऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीला वारंवार कॉल करत असाल आणि मध्येच जुन्या रेडिओत यायचा तसा सिग्नल जाण्याचा आवाज येत असेल तर सावध होणं गरजेचं आहे. वारंवार कॉल ड्रॉप होत असेल तर हे कॉल टॅपिंगचं लक्षण असू शकतं; पण केवळ कॉल ड्रॉप होत असेल तर कॉल टॅपिंगमुळे असं होतंय असं समजणं चुकीचं आहे. कॉल रेकॉर्डिंगबाबत बोलायचं झालं तर, कॉलदरम्यान तुम्हाला बीप साउंडकडे लक्ष द्यावं लागेल. कॉलदरम्यान सारखा बीप -बीप असा आवाज येत असेल, तर तुमचा कॉल रेकॉर्ड केला जातोय असं समजावं. एखादा कॉल रिसीव्ह केल्यानंतर बराच वेळ बीपचा आवाज येतो, हेदेखील कॉल रेकॉर्डिंग सुरू असल्याकडे इशारा करतं. तुमच्याकडे नवीन अँड्रॉइड फोन असेल तर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण या स्मार्टफोनमध्ये हे फीचर इनेबल करताच तुम्हाला त्याचा अलर्ट मिळतो. यावरून तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, असं तुम्हाला समजू शकतं.
कॉलदरम्यान एका बीपऐवजी बराच वेळ बीप वाजत असेल किंवा दुसऱ्या टोनचा आवाज येत असेल तर तुम्ही सतर्क होणं गरजेचं आहे. या माध्यमातून तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगविषयी माहिती मिळू शकते.