JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट नक्की लावा; अन्यथा 'या' कारणामुळे एअरबॅगही असूनही उपयोग होणार नाही

कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट नक्की लावा; अन्यथा 'या' कारणामुळे एअरबॅगही असूनही उपयोग होणार नाही

अपघात झालाच तर कारमधले प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी सीट बेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. मात्र यापैकी एक गोष्ट नसेल तर प्रवाशांची सुरक्षितता लक्षणीयरित्या कमी होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर: गेल्या काही वर्षांत, नवीन कार (Car) खरेदी करताना सुरक्षाविषयक (Safety) घटकांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. निःसंशयपणे ही बाब इंधनाच्या आर्थिक नियोजन इतकी महत्त्वाची बनली आहे. परिणामी, भारतीय बाजारपेठेसाठी सुरक्षित कार उपलब्ध करून देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांना प्रवृत्त केलं जात आहे. सध्याच्या काळात `तुमची नवीन कार सुरक्षित आहे,` असा विश्वास खरेदीदारांच्या मनात निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, विक्री करण्यात आलेल्या कारमध्ये एअर बॅग (Airbags) देणं होय. कारची किंमत कितीही असली तरी सर्व गाड्यांमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, सीटबेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेन्सरसारख्या (Rear Parking Sensor) गोष्टी अनिवार्य करण्याचं सर्व श्रेय भारत सरकारला जातं. तथापि, जर प्रवाशांनी कारमधून जाताना सीट बेल्ट (Seat Belt) लावला नसेल तर त्या कारमध्ये देण्यात आलेल्या एअरबॅग्ज निरूपयोगी ठरतात, ही महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. अपघात झालाच तर कारमधले प्रवासी सुरक्षित राहावेत यासाठी सीट बेल्ट आणि एअरबॅग एकत्र काम करतात. मात्र यापैकी एक गोष्ट नसेल तर प्रवाशांची सुरक्षितता लक्षणीयरित्या कमी होते. अपघात झाल्यास हे दोन्ही घटक प्रवाश्यांना आहे त्या स्थितीत स्थिर ठेवण्यासाठी, डॅशबोर्डसारख्या गोष्टी उडण्यापासून तसंच प्रवाशांना गंभीर जखमा होऊ नयेत यासाठी आहेत. प्रवासादरम्यान सीट बेल्ट तुम्हाला आहे त्या जागेवर स्थिर ठेवतो तर कारच्या पुढील भागाचा मार लागून तुमच्या छाती आणि डोक्याला इजा होऊ नये यासाठी एअरबॅग उपयुक्त ठरतात. काही मोठी स्पेस असलेल्या कारमध्ये नी एअरबॅग (Knee Airbags) आणि कर्टन एअरबॅग (Curtain Airbags) असतात. अपघातावेळी कारचा बाजूच्या भागाचं नुकसान झालं तर त्या बाजूला बसलेल्या व्यक्तींचं संरक्षण व्हावं, यासाठी अशा एअरबॅग्ज दिलेल्या असतात. कार सुरक्षेच्या अनुषंगाने मर्सिडीज बेंझ एस क्लास सारख्या (Mercedes Benz S Class) कारमध्ये एक नवीन संकल्पना पाहायला मिळते. या कारमध्ये एक एअरबॅग सीट बेल्ट मध्ये बसवलेली असते. पण प्राथमिक प्रतिरोध हा एअरबॅग नसून सीट बेल्ट आहे, ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही कारमधून सीट बेल्ट न लावता प्रवास करत असाल आणि एअरबॅग उघण्याइतकी जोरात वाहनांची टक्कर झाली तर अशा वेळी गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. 9 मिनिटांत 20 KM अंतर केलं पार; सीटबेल्टही नाही, ‘ही’ ठरली सायरस मिस्त्रींच्या अपघाताची कारणं? कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठीदेखील ही बाब महत्त्वाची आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी थ्री-पॉईंट सीटबेल्ट दिलेले असतात आणि त्यांनी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनामुळे सीट बेल्टचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मिस्त्री यांचा मृत्यू 5 स्टार एनसीएपी क्रॅश चाचणी रेटेड कारमध्ये झाला. अपघातावेळी ते मागील बाजूस सीट बेल्ट न लावता प्रवास करत होते. जुलै 2019 पासून भारतात कारमध्ये ड्रायव्हर साईड एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे एप्रिल 2021 पासून कारमध्ये फ्रंट पॅसेंजर साइड एअरबॅग असणं बंधनकारक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या