JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'हम आपके हैं कौन' चित्रपटाच्या 'त्या' सीनमधील Anupam Kher यांच्या 'चेहऱ्यामागचं खरं सत्य तुम्हाला माहिती आहे का?

'हम आपके हैं कौन' चित्रपटाच्या 'त्या' सीनमधील Anupam Kher यांच्या 'चेहऱ्यामागचं खरं सत्य तुम्हाला माहिती आहे का?

अनुपम खेर प्रदीर्घ काळापासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून लोकांना हसवणारे अनुपम आज आपला खास दिवस (Anupam Kher Birthday) सेलिब्रेट करत आहेत. आज अनुपम खेर यांचा 67वा वाढदिवस आहे.

जाहिरात

Anupam Kher

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मार्च: प्रत्येक चित्रपटाच्या यशामागे मुख्य कलाकारांसोबतच सहकलाकारांच्या (Co-star) भूमिकांचादेखील मोठा वाटा असतो. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी चित्रपट प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडता येतो. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी सहकलाकाराच्या भूमिकांना एक वेगळं महत्त्व मिळवून दिलं आहे. अशा कलाकारांमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) यांचा समावेश होतो. अनुपम खेर प्रदीर्घ काळापासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करून लोकांना हसवणारे अनुपम आज आपला खास दिवस (Anupam Kher Birthday) सेलिब्रेट करत आहेत. आज अनुपम खेर यांचा 67वा वाढदिवस आहे. 7 मार्च 1955 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे त्यांचा जन्म झाला. बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी हॉलिवूडमध्येही (Hollywood) नाव कमवलं. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ चित्रपटानंतर अनुपम खेर यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि ते मोठे स्टार झाले. अनुपम खेर यांनी आपल्या अॅक्टिंग करिअरमध्ये (Acting career) खूप संघर्ष (Struggle) केला आहे. यश मिळण्यास सुरुवात झाली होती तेव्हाच त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. अनुपम यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hain Koun) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना फेशियल पॅरॅलिसिस (Facial Paralysis) झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. पण, त्यांनी माघार घेतली नाही. हसत हसत या संकटाचा सामना करून त्यांनी आपल्या आजारावर मात केली. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यानंतरही त्यांनी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं नाही. ज्येष्ठ टीव्ही पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये अनुपम खेर यांनी या घटनेबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, ‘एक दिवस मी अनिल कपूरच्या घरी जेवत होतो. तेव्हा अनिलची पत्नी सुनीता यांना माझा एक डोळा जास्त उघडझाप (Blinking) करत असल्याचं लक्षात आलं. मला वाटलं की थकव्यामुळे असं झालं असावं. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करत असताना पुन्हा माझा एक डोळा मिटला आणि तोंडातून पाणी बाहेर आलं. त्यानंतर डोळ्यात साबणही गेला.’ त्यांनी पुढं सांगितलं की, ते यश चोप्रांच्या घरी गेले व त्यांना चेहऱ्यामध्ये बदल झाल्याचं सांगितलं. यामुळे यश चोप्रांनी (Yash Chopra) त्यांना वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. यश चोप्रांच्या सल्ल्यानंतर अनुपम डॉक्टरांकडे गेले. अनुपम यांना फेशियल पॅरॅलिसिस झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आणि दोन महिने काम न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी अनुपम खेर ‘हम आपके है कौन’चं शूटिंग (Shooting) करत होते. त्यांनी घरी न बसता काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी शूटिंगसाठी फिल्मिस्तान स्टुडिओ (Filmistan Studios) गाठला. अनुपम खेर यांच्या चेहऱ्यात बदल झाला होता. मात्र, ते काहीतरी कॉमेडी करत असावेत, असा समज सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा झाला होता. पण नंतर अनुपम यांनी सगळ्यांना एकत्र करून आपल्या आजाराची कल्पना दिली. त्यानंतर चित्रपटात अनुपम खेर यांच्यासाठी काही सीन बदलण्यात आले. जेणेकरून ते तोंड वाकडं करून मुद्दाम अभिनय करत आहेत असंच प्रेक्षकांना वाटावं असे ते सीन होते. त्यामुळे त्यांचं दुखणं लपलं आणि सीनही शूट झाले. अनुपम यांनी जिद्दीने आजारपणावरही मात केली पण आपलं कर्तव्य सोडलं नाही. करिअर करण्यासाठी जेव्हा अनुपम खेर मुंबईत आले होते तेव्हा त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पैशांची कमतरता असल्यामुळे सुरुवातीला अनेक रात्री त्यांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर काढल्या होत्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकानेक शुभेच्छा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या