मुंबई, 25 मे : काश्मीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला एनआयएच्या विशेष कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने याआधी यासिन मलिकला दोषी ठरवलं होतं. यासिनला शिक्षा होणार हे निश्चित झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मात्र पोटात दुखायला लागलं. बंदी असलेली संघटना जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या यासिन मलिकला पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे. ‘भारत मानवाधिकारांविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबत आहे. यासिन मलिकवर लावण्यात आलेले खोटे आरोप काश्मीरचा स्वातंत्र्याचा संघर्ष रोखू शकणार नाहीत. काश्मीरच्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या या बेकायदेशीर कारवायांची संयुक्त राष्ट्रांनी दखल घ्यावी,’ असं ट्वीट शाहिद आफ्रिदीने केलं.
शाहिद आफ्रिदीच्या या ट्वीटवर भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने (Amit Mishra) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘प्रिय शाहिद आफ्रिदी, त्याने कोर्टात स्वत:च दोष कबूल केले आहेत. तुझ्या वाढदिवसाप्रमाणे सगळ्या गोष्टी दिशाभूल करणाऱ्या नसतात,’ असा टोला अमित मिश्राने हाणला आहे.
शाहिद आफ्रिदी त्याच्या वयावरून कायमच वादात राहिला. आयसीसीनुसार आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 ला झाला होता, म्हणजेच तो 42 वर्षांचा आहे. पण 2019 साली आफ्रिदीने खुलासा केला, की 1996 साली नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 37 बॉलमध्ये शतक केलं तेव्हा आपलं वय 16 वर्ष नव्हतं. मी तेव्हा 19 वर्षांचा होतो, पण 16 वर्षांचा असल्याचा दावा करण्यात आला. 1975 साली माझा जन्म झाला होता, पण अधिकाऱ्यांनी माझं वय चुकीचं लिहिलं, असं आफ्रिदीने त्याचं आत्मचरित्र गेम चेंजरमध्ये सांगितलं.